माझ्यासाठी उदयनराजेंची मारामारी : रघुनाथराजे
By Admin | Updated: April 10, 2015 00:26 IST2015-04-09T23:27:11+5:302015-04-10T00:26:48+5:30
फलटणमध्ये गौप्यस्फोट : दोन्ही राजे समोरासमोर येताच मिटेल संघर्ष; मठाचीवाडी येथील कार्यक्रमात भावनिक आवाहन

माझ्यासाठी उदयनराजेंची मारामारी : रघुनाथराजे
सातारा : सातारचे भोसले घराणे आणि फलटणचे नाईक-निंबाळकरांचे घराणे या नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही घराण्यातील नातेसंबंध साडेचारशे वर्षांपासूनचे आहेत. सध्या या दोन घराण्यात जो राजेसंघर्ष सुरू आहे त्याचा नात्यांवर परिणाम होत आहे. राजकारण क्षणिक आहे. उदयनराजेंनी माझ्यासाठी पूर्वी मारामारी केली होती. त्यांचे माझ्यावर प्रेम असून राजकारणासाठी मी उदयनराजेंसारखी प्रेमाची माणसे दुखावणार नाही, असे भावुक उद्गार रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी काढले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ‘राजेसंघर्ष’ सुरू असून यानिमित्तानं आता राजे घराण्यांतील दोस्तानाही समोर आला आहे.
मठाचीवाडी, ता. फलटण येथील एका सत्कार समारंभात ते बोलत होते. जिल्ह्यात सध्या खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषद सभापती रामराज नाईक-निंबाळकर यांच्यात जी शाब्दिक चकमक सुरू आहे त्याअनुषंगाने बोलताना रघुनाथराजे यांनी याबाबत खंत व्यक्त केली.
रघनाथराजे म्हणाले, ‘राजकारणामुळे उदयनराजेंसारखी प्रेमाची माणसे दुरावतात, त्यामुळे यापुढे प्रेमाच्या माणसांना एकही शब्द बोलणार नाही. दोन्ही घराण्याचे साडेचारखे वर्षांपासूनचे नातेसंबंध आहेत.
आजपर्यंतच्या तेरा पिढ्यांमध्ये नऊवेळा दोन्ही घराण्यात नातेबंध प्रस्थापित झाले आहेत. दोन्ही घराण्याला जाज्वल्य इतिहास आहे. केवळ क्षणिक राजकारणासाठी या नात्यांमध्ये दरी निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करून खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक-निंबाळकर हे दोघे जोपर्यंत समोरासमोर येत नाहीत, तोपर्यंत दोघांमधील वैचारिक मतभेद संपणार नाहीत आणि आरोप-प्रत्यारोपांचे हे बॅडमिंटन
असेच सुरूच राहणार आहे. या राजेसंघर्षाला पूर्णविराम मिळाला पाहिजे.
मठाचीवाडी येथील स्वप्नील भोसले यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आरटीओपदी निवड झाली आहे. यानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते स्वप्नील भोसले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तरच ‘राजेसंघर्षा’ला पूर्णविराम मिळेल
सध्या जिल्ह्यात सातारचे भोसले घराणे आणि फलटणचे नाईक-निंबाळकर घराणे यांच्यात जी शाब्दिक लढाई सुरू आहे ती केवळ राजकारणामुळेच. मात्र, क्षणिक राजकारणापायी दोन्ही घराण्यातील नात्यांमध्ये दरी निर्माण होऊ नये, यासाठी दोघांनीही समोरासमोर येण्याची गरज आहे. ज्यावेळी उदयनराजे आणि रामराजे समोरासमोर येतील तेव्हा ‘राजेसंघर्ष’ संपलेला असेल, अशी अपेक्षा रघुनाथराजेंनी व्यक्त केली.
तरच ‘राजेसंघर्षा’ला पूर्णविराम मिळेल
सध्या जिल्ह्यात सातारचे भोसले घराणे आणि फलटणचे नाईक-निंबाळकर घराणे यांच्यात जी शाब्दिक लढाई सुरू आहे ती केवळ राजकारणामुळेच. मात्र, क्षणिक राजकारणापायी दोन्ही घराण्यातील नात्यांमध्ये दरी निर्माण होऊ नये, यासाठी दोघांनीही समोरासमोर येण्याची गरज आहे. ज्यावेळी उदयनराजे आणि रामराजे समोरासमोर येतील तेव्हा ‘राजेसंघर्ष’ संपलेला असेल, अशी अपेक्षा रघुनाथराजेंनी व्यक्त केली.