Udayan Raju changed ...: attention to development works | उदयनराजे बदललेत... : विकासकामांकडे लक्ष
उदयनराजे बदललेत... : विकासकामांकडे लक्ष

ठळक मुद्देआरोग्य, क्रीडा, पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न

दीपक शिंदे ।
सातारा : ‘एक बार मंैने जो कमिटमेंट कर दी तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता..’ अशा बेधडक स्टाईलमुळे आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेले उदयनराजे भोसले आता ऐकण्याच्या नाही तर कृती करून दाखविण्याच्या मूडमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि निकालाच्या दिवसापासूनच त्यांनी कामाचा धडाका सुरू केला. सोलापूर, सातारा, कºहाड, फलटण, महाबळेश्वर या भागांमध्ये दौरे करून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली त्यामुळे त्यांच्यातील हा बदल नक्कीच जाणवू लागला आहे. यामुळे उदयनराजे आता बदललेत.. खरं काय? अशी चर्चा शहरात सुरू आहे.

गेली दहा वर्षे खासदार म्हणून सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार उदयनराजे भोसले यावेळी पुन्हा दिल्लीत जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत आहेत. सातारा लोकसभा मतदार संघात त्यांनी हॅट्ट्रिक केली आणि मोदी लाटेतही साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्याची टिकटिक कायम ठेवली. आता तर ते आपल्या धडाकेबाज स्टाईलने कामाला लागले आहेत. उदयनराजे यांच्यातील हा बदल सर्वांच्याच नजरेत येण्यासारखा आहे. हा सकारात्मक बदल नक्कीच जिल्ह्याला विकासाच्या नवीन वाटेवर घेऊन जाईल, अशी आशा पल्लवीत झाली आहे.
सातारा नगरपालिकेत खासदार उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. गेली दोन वर्षे नगरसेवक आणि नगराध्यक्षांमधील मतभेदांमुळे कुठेतरी विकासाचा प्रश्न मागे पडत होता. ते लक्षात आल्याबरोबरच निकालाच्या दुसºयाच दिवशी उदयनराजेंनी नगरसेवकांची बैठक घेऊन सर्वांनाच तंबी दिली. तसे विकासकामांबाबत ते अधूनमधून बैठक घेतच असतात; पण निवडणुकीनंतरच्या या बैठकीला विशेष महत्त्व होते. कास धरणाच्या सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

दुष्काळी भागातील अडचणी समजून घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाºयांसोबत बैठक घेतली. दुष्काळी गावांना मदत करण्यात कोणतीही हयगय करू नका, असा इशाराच त्यांनी दिला. तर दुष्काळी भागातील जनतेसाठी उरमोडीचे पाणी सोडण्याच्या सूचनाही केल्या. दुष्काळाचा मुद्दा आपल्या हातून जातो की काय म्हणून अशी बैठक घेण्याचा उदयनराजेंना अधिकार नाही, असे विरोधकांचे राजकारणही झाले. पण त्यांना जुमानतील ते उदयनराजे कसले. ही बैठक संपते ना संपते तोच जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना मिळणाºया सेवांचा आढावा घेतला. रुग्णांना जिल्हा रुग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी आपण पाठपुरावा करू; पण जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यासाठी नियोजन करावे, असे मतही मांडले.

जागतिक पर्यावरणदिनानिमित्त झाडे लावण्याचा आणि ती जगविण्याचा संदेश दिला. तर
वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त करत हे वेळीच थांबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. सकाळी मॉर्निंग वॉक करत आरोग्याची काळजी घेण्याचा आणि आरोग्य जपण्याचा संदेशही दिला. मंगळवार तळ्याची मालकी राजघराण्याची असली तरी त्याचा वापर सार्वजनिक कामासाठीच झालेला आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून तळ्याची स्वच्छता करावी, असे भूमिकाही त्यांनी मांडली.

‘वेल स्टार्ट इज हाफ डन,’ असे सांगत त्यांनी औद्योगिक वसाहतीमधील प्रश्न समजून घेण्यासाठी उद्योजकांची बैठक घेतली. ज्या जागा विनाकारण अडवून ठेवल्या आहेत किंवा मोकळ्याआहेत, त्या नवीन उद्योजकांना देण्याच्या सूचना केल्या. उद्योजकांनी आपल्या उद्योगांचा विकास करावा उगाच लोकप्रतिनिधींवर अपयशाचे खापर फोडण्याऐवजी आपले उद्योग सातासमुद्रापार पोहोचवावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या एकूणच धडाकेबाज कामामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटू लागले आहे. तर अपुरे संख्याबळ असतानाही कशी कामे करून घ्यावयाची असतात याचा कानमंत्र खासदार शरद पवारांकडून घेतल्यामुळे आता त्यांचा हा कामाचा वारू कोणालाही थांबविता येणार नाही.

खरंतर त्यांचा हा कामाचा झंझावात असाच सुरू राहावा, अशी अपेक्षा सातारकर आणि राज्यातील त्यांचे चाहतेही व्यक्त करत आहेत. दोन दिवसांतच विठ्ठलाच्या पायी लीन होत तर तुळजाभवानीला साकडे घालत राज्यातील जनतेला दुष्काळाच्या छायेतून वाचव, अशी प्रार्थनाही उदयनराजे करणार आहेत. त्यांचे हे गाºहाणे विठ्ठलाने ऐकावे आणि आई तुळजाभवानीने त्यांना भविष्यात कामाचा धडाका असाच ठेवण्याची शक्ती द्यावी, अशी अपेक्षा सर्वजण करत आहेत.


पालिकेची नवीन इमारत बांधणार
नगरपालिकेची इमारत ही प्रशस्त आणि सुसज्ज असावी, एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी सदर बझार येथे मोठी प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार असून, त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती खासदार उदयनराजे यांनी दिली. त्यामुळे साताऱ्यात पालिकेची भव्य इमारत उभी राहणार
आहे.


जिल्हा क्रीडा संकुलाचे केले व्यापारी संकुल
जिल्हा क्रीडा संकुलावर विविध स्पर्धा भरविण्यात याव्यात, खेळाडूंना मुक्तपणे या क्रीडा संकुलाचा वापर करता यावा; पण असे होताना दिसत नाही. काही ठराविक लोकच मक्तेदारी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या खेळाडूंना खेळांच्या समितीवर घ्या, तशी व्यवस्था नसेल तर तरतूद करा, अशा सूचनाही खासदार उदयनराजेंनी करत जिल्हा क्रीडा संकुलाचे व्यापारी संकुल करण्यात आले, अशी नाराजी व्यक्त करत आता झाले ते झाले जे शिल्लक आहे तिथे तरी चांगल्या गॅलरी आणि स्पर्धा भरवा, असा सल्लाही त्यांनी दिला.


Web Title: Udayan Raju changed ...: attention to development works
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.