'सह्याद्री' साखर कारखाना निवडणूकीत 'उदयनराजें'ची उडी!
By प्रमोद सुकरे | Updated: March 13, 2025 11:24 IST2025-03-13T11:22:40+5:302025-03-13T11:24:01+5:30
इथं तर सत्तेचे केंद्रीकरण झालयं म्हणत बाळासाहेब पाटलांवर टीका

'सह्याद्री' साखर कारखाना निवडणूकीत 'उदयनराजें'ची उडी!
प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात सत्तेचे केंद्रीकरण झाल्याचे दिसत आहे. खरंतर कारखान्यात सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे होती, पण ती मिळालेली दिसत नाही. त्यामुळे मी कारखान्याचा सभासद नसलो तरी कारखान्याच्या सभासदांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त करत कारखाना निवडणूकीत उडी घेतली.
कराड येथील माध्यम प्रतिनिधिंशी खासदार भोसले बोलत होते.यावेळी कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव व अन्य माजी नगरसेवक उपस्थित होते.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ५ एप्रिल रोजी होऊ घातली आहे. कारखान्याची सत्ता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे अनेक वर्षापासून आहे. यंदा मात्र या निवडणुकीत भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांनी सर्वांना बरोबर घेत दंड थोपटले आहेत. त्यामुळे निवडणूक चांगलीच रंगणार असे चित्र असतानाच खासदार उदयनराजे भोसलेंनी ही याबाबत भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालेल्या आहेत.
खासदार भोसले म्हणाले, खरंतर महात्मा गांधीजींनी संदेश दिला होता की सत्तेचे केंद्रीकरण झाले तर मूठभर लोकांच्या हाती सत्ता जाते व इतरांना वाकवले जाते. आपल्याकडे सहकारात काम करणाऱ्या चेअरमनला आपणच मालक असल्याचे वाटायला लागतेय आणि ती सहकारी तत्त्वावरील संस्था खाजगी कारखान्याप्रमाणे चालवली जाते. त्यामुळे असे वाटणाऱ्यांनी खाजगी कारखाना काढावा म्हणजे निवडणुकीची वेळच येणार नाही असा टोला त्यांनी लगावला.
खरंतर दिवंगत चव्हाण साहेब असताना त्यांनी कराड तालुक्यातील भिकुनाना साळुंखे(किवळकर),बाबासाहेब साळुंखे (चोरेकर), आबासाहेब पाटील(पार्लेकर )यांच्याकडे ही जबाबदारी देण्याचे ठरवले होते. मात्र या तिघांच्यात एका नावावर एकमत न झालेने पी. डी. पाटील यांचे नाव स्वीकारले गेले. मात्र त्यानंतर पुढे सर्वांना संधी मिळायला पाहिजे होती. पण दुसऱ्या कोणालाही संधी मिळालेली नाही. सत्ताधाऱ्यांनी इतरांना संधी का दिली नाही ?याचे उत्तर दिले पाहिजे असेही भोसले म्हणाले.