सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रामराजे नाईक-निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील संघर्ष संपूर्ण राज्याला माहीत आहे. आता हे दोघेही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राजे मंडळींना अचानकपणे कमळाची भुरळ का बरं पडली असावी? या प्रश्नाने साताºयाच्या जनतेला भलतेच सतावले आहे. दोघांनीही राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडे पाठ फिरवली त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला अधिक जोर आला आहे.
राष्ट्रवादी काँगे्रसची स्थापना १९९९ मध्ये झाली. तेव्हा सातारा जिल्'ातून दिवंगत लक्ष्मणराव पाटील व रामराजे नाईक-निंबाळकर या दोन नेत्यांनी पक्षाला मोठी साथ दिली. या दोघांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपले प्राबल्य मिळवले. तर सहकारी संस्थाही आपल्या ताब्यात ठेवल्या. केंद्रात व राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या तरी सातारा जिल्ह्यावरील राष्ट्रवादीची राजकीय पकड कायम राहिली.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही सातारा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने वर्चस्व राखले आहे. या भक्कम परिस्थितीतही ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे बुरुज ढासळू लागले आहेत. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही शिवस्वराज्य यात्रेकडे पाठ फिरवली. त्यांचे बंधू व सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण हे दोघे शिवस्वराज्य यात्रेच्या व्यासपीठावर हजर होते; परंतु रामराजेंची अनुपस्थिती नेतेमंडळींना बोचणारी ठरली. रामराजे हे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव आहे. राष्ट्रवादीनेही त्यांना मोठी पदे बहाल केली. विधान परिषदेचे सभापतिपद त्यांना दिले. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांचे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे आहे. जिल्हा परिषद, जिल्हा बँक या प्रमुख संस्थांमध्ये रामराजेंच्या शब्दाला मान आहे, असे असताना हे सर्व वैभव सोडून रामराजे भाजपमध्ये का जात आहेत? हा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सलत आहे.