उदयनराजे राजकीय भूकंपाच्या तयारीत

By Admin | Updated: September 20, 2014 00:33 IST2014-09-19T22:26:59+5:302014-09-20T00:33:19+5:30

‘जलमंदिर’वर बैठक : सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याबद्दल कार्यकर्त्यांची नाराजी

Udayan Raje launches political earthquake | उदयनराजे राजकीय भूकंपाच्या तयारीत

उदयनराजे राजकीय भूकंपाच्या तयारीत

सातारा : विधानसभेची निवडणूक उंबरठ्याशी येऊन ठेपली असतानाच ‘मोठा राजकीय भूकंप’ करण्याचे संकेत खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘कार्यकर्त्यांचा सन्मान होईल असा निर्णय’ लवकरच घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक ‘जलमंदिर पॅलेस’ येथील उदयनराजेंच्या संपर्क कार्यालयात झाली. केवळ उदयनराजेंचे कार्यकर्ते म्हणून विविध विकासकामांच्या संदर्भात आपली जाणूनबुजून अडवणूक होत असून, दुजाभाव व सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी या बैठकीत व्यक्त केल्या. ‘याबाबबत तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र बैठका आयोजित करुन, कार्यकर्त्यांची खंत तपासून, त्यांच्या भावनांचा आदर राखण्यासाठी निर्णायक भूमिका जाहीर करु’ असे उद््गार खासदार उदयनराजे यांनी यावेळी काढले. यामुळे नजीकच्या काळात जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होऊन अनेक जणांचे गड कोलमडून पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या विचारांचे कार्यकर्ते आहेत. त्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. ‘आमच्या तालुका किंंवा जिल्हा पातळीवरील प्रस्तावांची पध्दतशीर बोळवण केली जाते किंंवा अडवणूक केली जाते. ही अडवणूक आम्ही केवळ खासदार उदयनराजेंचे कार्यकर्ते असल्यानेच केली जाते. त्यांच्या कार्यकर्त्यांचे प्रस्ताव प्रलंबित कसे राहतील, लांबवले कसे जातील, तांत्रिकदृष्ट्या रद्द कसे होतील असे षड्यंंत्र हेतुपुरस्सर राबविले जात आहे. याबाबत आपण शहानिशा करावी. आम्ही त्याची उदाहरणे लगेच देऊ,’ असे संतप्त गाऱ्हाणे प्रमुख कार्यकर्त्यांनी खासदार उदयनराजेंसमोर मांडले. त्याचबरोबर, ‘आपण आम्हाला दिशा द्या, आम्ही ताकद दाखवून देऊ; परंतु अशा प्रकारची अडवणूक, अपमान, दुजाभाव, सापत्नपणाची वागणूकसहन करणार नाही,’ असा निर्धारही कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला, असे ‘जलमंदिर’मधून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
‘कार्यकर्त्यांमुळे मी आहे. कार्यकर्त्यांपेक्षा मी मोठा नाही. कार्यकर्त्यांची वेदना ती आमची वेदना. तीच माझी भूमिका आहे. खरोखरच सापत्नभावाची वागणूक आणि दुजाभाव होत असेल तर कार्यकर्त्यांचा अपमान गिळून गप्प बसणार नाही. लवकरच तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित करुन, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखला जाईल असा निर्णय घेईन,’ अशा शब्दांत खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिलासा दिल्याचे पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

कुणाकुणावर साधणार नेम..?
लोकसभा निवडणुकीपूर्वीच उदयनराजेंच्या पक्षांतर्गत विरोधकांच्या कुरघोड्या आणि उदयनराजेंना उघड विरोध अशा बाबी जगजाहीर झाल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर सर्व उमेदवार लोकसभा निवडणुकीत ‘काठावर पास’ झाले असताना उदयनराजेंनी मोठे मताधिक्य मिळविले होते.
पक्षांतर्गत विरोधाला हे चपखल उत्तर मानले जात असतानाच ‘राष्ट्रवादीचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांचे हे गाऱ्हाणे नव्याने समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजेंनी राजकीय भूकंपाचे सूतोवाच केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Web Title: Udayan Raje launches political earthquake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.