भरदिवसा चोरट्यांनी तीन घरे फोडली उंब्रजमधील घटना
By Admin | Updated: September 16, 2014 23:26 IST2014-09-16T22:24:20+5:302014-09-16T23:26:31+5:30
पंधरा तोळे दागिन्यांसह रोकड लंपास

भरदिवसा चोरट्यांनी तीन घरे फोडली उंब्रजमधील घटना
उंब्रज : घरातील सर्वजण खरेदीसाठी बाजारपेठेत गेले असताना चोरट्यांनी तीन घरे फोडली. दोन घरांमधून चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. मात्र, तीसऱ्या घरात हाती लागलेल्या पंधरा तोळ्याच्या दागिण्यांसह दहा हजाराची रोकड घेऊन त्यांनी पोबारा केला. येथील चोरे रोड परीसरात मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उंब्रज येथील चोरे रोड परीसरात वास्तव्यास असणारे बहुतांश ग्रामस्थ दररोज सायंकाळी खरेदीसाठी बाजारपेठेत जातात. यादरम्यान या भागातील बहुतांश घरांना कुलूप असते. मंगळवारी सायंकाळी राजेंद्र जयसिंगराव साळूंखे, अमृता प्रकाश पवार व अशोक बाजीराव देशमुख यांच्या घरातील महिला खरेदीसाठी बाजारपेठेत गेल्या. तर कुटूंबातील इतर सदस्य कामानिमित्त बाहेर गेले. चोरट्यांनी ही संधी साधून तीन्ही घरे फोडली. राजेंद्र जयसिंगराव साळूंखे यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटामध्ये असलेले पंधरा तोळ्याचे दागिणे व दहा हजाराची रोकड त्यांनी लंपास केली. तसेच तेथुन काही अंतरावर असलेल्या अमृता प्रकाश पवार व अशोक बाजीराव देशमुख यांच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून चोरटे घरात घुसले. त्यांनी या दोन्ही घरातील कपाटे उचकटली. साहित्य इतरत्र विस्कटले. मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही. दरम्यान, पाच वाजण्याच्या सुमारास राजेंद्र साळूंखे, अमृता पवार व अशोक देशमुख यांचे कुटूंबिय घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मारूती पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याबाबतची नोंद पोलिसात झाली नव्हती. (प्रतिनिधी)
ठसे संकलित घटनेचे गांभीर्य ओळखून उंब्रज पोलिसांनी तातडीने श्वान पथकाला पाचारण केले. घटनास्थळी दाखल झालेल्या श्वान पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तसेच ठसेतज्ज्ञांकडून घटनास्थळावरील ठसे संकलित केले जात होते.