शिराळाचे दोन युवक अपघातात ठार

By Admin | Updated: June 30, 2014 00:29 IST2014-06-30T00:28:17+5:302014-06-30T00:29:53+5:30

रामनगर येथील घटना : दुचाकीला धडक

Two youths of Shirala were killed in an accident | शिराळाचे दोन युवक अपघातात ठार

शिराळाचे दोन युवक अपघातात ठार



पाटण : कोयनानगर-रासाटी येथील व्यसनमुक्ती केंद्रात उपचार करवून घेतल्यानंतर दूचाकीवरुन परत निघालेल्या शिराळा तालुक्यातील दोन युवकांचा रामनगर येथे अपघाती मृत्यू झाला. धनाजी धुमाळ आणि संतोष राठोड अशी या युवकांची नावे असून शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील कोयनानगर-रासाटी येथे व्यसनमुक्ती उपचार केंद्र आहे. येथे अनेक ठिकाणाहून व्यसनाधीन उपचारासाठी येत असतात. धनाजी रखमाजी धुमाळ (वय ३०, रा. धुमाळ वस्ती, शिराळा) आणि संतोष व्यंकू राठोड (वय २८, रा. खंडागळे वस्ती, शिराळा) हे दोन तरुण कोयनानगर-रासाटी येथील व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी आले होते. उपचार झाल्यानंतर आपल्या दुचाकीवरून (एमएच १० एएम ४३१२) शिराळ्याकडे निघाले होते. कऱ्हाड-चिपळूण मार्गावर रामनगर येथे आले असता अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. मध्यरात्री अपघात घडल्यामुळे कोणाच्या लक्षातही आले नाही. परिणामी त्यांना तत्काळ मदत मिळाली नाही.
पाटण पोलीस ठाण्यात या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनाही पाटण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, जागेवरच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, रविवारी सकाळी दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. यानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Two youths of Shirala were killed in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.