सुरूर येथे कार पलटी झाल्याने दोन महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST2021-02-05T09:19:49+5:302021-02-05T09:19:49+5:30
पाचवड : महामार्गावर सुरूर गावानजीक कार अपघातात दोन महिला ठार, तर तीनजण जखमी झाले. हा अपघात बुधवारी (दि. ...

सुरूर येथे कार पलटी झाल्याने दोन महिला ठार
पाचवड : महामार्गावर सुरूर गावानजीक कार अपघातात दोन महिला ठार, तर तीनजण जखमी झाले. हा अपघात बुधवारी (दि. ३) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झाला.
महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कार (एमएच २ इयू ६२७६) चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार पलटी झाली. कारमधील चारजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर सुरूर ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य करून सर्व जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. दरम्यान, यातील दोन महिला उपचारादरम्यान मृत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रागिणी जयवंत खैरनार (वय ४७, रा.बंगलोर), ऊर्मिला दिवाकर गांगुर्डे (वय ८१, रा. वसई) या महिलांचा मृतांमध्ये समावेश आहे तसेच शैलेंद्र गांगुर्डे, सोहम गांगुर्डे, नील खैरनार हे तिघेही जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याबाबत भुईंज पोलीस रात्री उशिरापर्यंत पंचनामा व तपास करीत होते. घटनास्थळी प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते, दुभाजकाला कार वेगात धडकल्याने कार पलटी झाली.
सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भांडारे, हवालदार अवघडे तपास करत आहेत.