पोलीस असल्याचे भासवून दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST2021-04-04T04:40:45+5:302021-04-04T04:40:45+5:30
नीलेश सुरेश चव्हाण (वय २९, रा. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या ...

पोलीस असल्याचे भासवून दुचाकी लंपास
नीलेश सुरेश चव्हाण (वय २९, रा. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडळी येथील राहुल रामचंद्र साळुंखे हे ९ डिसेंबर २०२० रोजी विजयनगर येथील बसथांब्यावर असलेल्या सलूनमध्ये दाढी करीत होते. त्यावेळी पोलिसाचा पोषाख परिधान केलेला एक युवक त्याठिकाणी आला. त्याच्या हातात फायबरची काठी तसेच पाठीवर सॅक होती. त्याने ती काठी व सॅक संबंधित सलूनच्या दुकानात ठेवली. तसेच तेथून जवळच असलेल्या आरटीओ कार्यालयातून बॅच आणायचा असल्याचे सांगून राहुल साळुंखे यांच्याकडे दुचाकी मागितली. पोलीस दुचाकी मागत असल्यामुळे राहुल यांनी विश्वासाने दुचाकी त्याला दिली. मात्र, बराच वेळ थांबूनही संबंधित युवक परत आला नाही. राहुल यांनी आरटीओ कार्यालयात जाऊन त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. पोलीस ठाण्यात जाऊनही राहुल यांनी वर्णन सांगून संबंधिताचा शोध घेतला. मात्र, संबंधित युवक हा पोलीस नसून त्याने बतावणी करून आपली दुचाकी लंपास केल्याचे साळुंखे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी याबाबतची फिर्याद कऱ्हाड शहर पोलिसात दिली.
दरम्यान, फसवणुकीच्या एका गुन्ह्यात नीलेश चव्हाण हा मुंबई रेल्वे पोलिसांच्या अटकेत होता. त्याने विजयनगरमधील या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे कऱ्हाड शहर पोलिसांनी त्याला या गुन्ह्यात वर्ग करून अटक केली आहे.