दुचाकी सुसाट; चारचाकीला ‘नो एण्ट्री’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST2021-08-27T04:42:15+5:302021-08-27T04:42:15+5:30
साताऱ्यासह कोकणातून येणारी वाहने कोयना नदीवरील नव्या पुलावरून कऱ्हाडात प्रवेश करतात. नदीवर त्यासाठी चौपदरी मोठा पूल आहे. मात्र, दैत्यनिवारणी ...

दुचाकी सुसाट; चारचाकीला ‘नो एण्ट्री’!
साताऱ्यासह कोकणातून येणारी वाहने कोयना नदीवरील नव्या पुलावरून कऱ्हाडात प्रवेश करतात. नदीवर त्यासाठी चौपदरी मोठा पूल आहे. मात्र, दैत्यनिवारणी मंदिरानजीक ब्रिटिशकालीन लोखंडी पूल असून, या पुलावरून केवळ दुचाकीची वाहतूक होते. पूल कमकुवत झाल्यामुळे पुलावरील चारचाकी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. तसेच पुलाच्या दोन बाजूस खांब उभारण्यात आले. या खांबांमधून वाट काढीत केवळ दुचाकी व पादचारीच या पुलावरून ये-जा करतात. काही वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या पुलाच्या मजबुतीकरणासाठी निधी मंजूर केला. त्यातून मजबुतीकरणाचे कामही करण्यात आले. या कामानंतर येथून चारचाकी वाहतूक सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यानंतरही पूल चारचाकीसाठी बंदच होता. जानेवारी २०२१ मध्ये पुन्हा या पुलाचा सर्व्हे करण्यात आला. चारचाकी वाहतुकीसाठी पूल सुरक्षित आहे का, याची खातरजमा करण्यात आली. वाळूने भरलेले डंपर पुलावरून नेण्यात आले. तसेच सकाळी, दुपारी आणि रात्री उशिरा तापमानाचा पुलावर होणारा परिणामही तपासण्यात आला. सर्व चाचण्या पार पडल्यानंतर पूल हलक्या वाहनांसाठी खुला करता येऊ शकतो, असे निष्पन्न झाले.
माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यावेळी पुलाची पाहणी केली. पूल हलक्या चारचाकी वाहनांसाठी आठवड्यात खुला होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अद्यापही पुलावरून वाहतूक सुरू झालेली नाही. पुलाचे घोंगडे अद्यापही भिजत पडले आहे.
- चौकट
चारचाकी वाहतुकीत अडथळे
१) पुलाची रुंदी कमी असल्याने अपघाताचा धोका
२) दोन्ही बाजूस रस्त्याची झालेली दुरवस्था
३) दैत्यनिवारणी मंदिरानजीक खचलेला रस्ता
४) पुलापासून वारूंजी फाट्यापर्यंतचे अतिक्रमण
५) रस्त्यावर बसणारे किरकोळ विक्रेते
- चौकट
झोपडपट्टी अद्याप जैसे थे
जुन्या पुलाच्या पूर्व बाजूला दैत्यनिवारणी मंदिरानजीक रस्त्यालगतच झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीचा प्रश्नही अद्याप जैसे थे आहे. चारचाकी वाहतूक सुरू करण्यापूर्वी झोपडपट्टीच्या सुरक्षेचा विषय बांधकाम विभागाला मिटवावा लागेल. झोपडपट्टीसमोर संरक्षक रेलिंग अथवा कठडे उभारणे गरजेचे आहे. मात्र, त्याबाबत कसलीच कार्यवाही अद्याप झालेली नाही.
- चौकट
उंचीरोधक उभारण्याची गडबड
पुलाच्या दोन्ही बाजूस बांधकाम विभागाने उंचीरोधक खांब उभारले आहेत. रस्त्यासह इतर प्रश्न अद्याप मिटलेले नसताना उंचीरोधक उभारण्याची गडबड कशासाठी, हा प्रश्न आहे.
- चौकट
हलकी वाहतूक सुरू झाल्यास...
१) कोल्हापूर नाक्यावरील ताण कमी होणार
२) कोल्हापूर नाक्यापासून दत्त चौकापर्यंतची कोंडी कमी
३) पुणे, सातारा, पाटणकडून येणारी वाहने जुन्या पुलावरून कऱ्हाडात येणार
४) दैत्यनिवारणी मंदिरापासून शाहू चौक रस्त्याला वर्दळ वाढणार
५) बाजारपेठ विस्ताराला वाव मिळणार
फोटो : २६केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडात कोयना नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावर हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी उंचीरोधक खांब उभारण्यात आले आहेत.