साताऱ्यात ट्रकने दोघांना चिरडले
By Admin | Updated: June 28, 2014 00:33 IST2014-06-28T00:30:29+5:302014-06-28T00:33:56+5:30
दोन अपघात : संतप्त जमावाकडून ट्रकची तोडफोड

साताऱ्यात ट्रकने दोघांना चिरडले
सातारा / किडगाव : सातारा शहराजवळ दोन ठिकाणी झालेल्या अपघातांत दोघेजण जागीच ठार झाले आहेत. प्रदीप रघुनाथ बडदरे आणि संजय विष्णू कणसे अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. दोघेही सातारा तालुक्यातील होते. हे अपघात शुक्रवारी दुपारी व सायंकाळच्या सुमारास झाले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास प्रदीप बडदरे (वय २६, रा. सारखळ, ता. सातारा) हा युवक दुचाकीवरून साताऱ्यातून मेढा रस्त्याने सारखळकडे जात होता. त्याच्या दुचाकीवर कृष्णात भाऊसाहेब साळुंखे (वय ३१, रा. सारखळ) हा बसला होता. येथील करंजेतील टीसीपीसीजवळ आल्यावर समोरील बाजूने वाळूने भरलेला ट्रक येत होता. या ट्रकची व दुचाकीची धडक झाली. यामध्ये प्रदीप बडदरे हा गंभीर जखमी झाला. कृष्णात साळुंखे जखमी झाला. गंभीररीत्या जखमी झालेल्या प्रदीपला दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच प्रदीपचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दुसरा अपघात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सातारा शहराजवळील कोडोलीच्या पुढे रहिमतपूर रस्त्यावर खोकडवाडी फाट्याजवळ घडला. संजय कणसे (वय ४५, रा. अंगापूर वंदन, ता. सातारा) हे दुचाकी (एमएच ११ बीबी ७८९३) वरून अंगापूर वंदनकडे चालले होते. यावेळी समोरून आलेल्या ट्रक (एमएच ४३ वाय ७४८८) ने दुचाकीला धडक दिली. यामध्ये कणसे हे जागीच ठार झाले.