खंबाटकीत ट्रक उलटून दोन ठार
By Admin | Updated: December 31, 2014 00:21 IST2014-12-31T00:15:15+5:302014-12-31T00:21:38+5:30
पुन्हा ‘एस’ वळण : क्रेनच्या सहायाने चक्काचूर वाहन उचलून मृतदेह काढले बाहेर

खंबाटकीत ट्रक उलटून दोन ठार
खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर बेगरुटवाडीजवळ ट्रक उलटून झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. अत्यंत घातक, अशास्त्रीय अशा ‘एस’ वळणावरच आणखी दोघांना जीव गमवावा लागल्याने या वळणावर मरण स्वस्त झाल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
याबाबत खंडाळा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, आज, मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मालट्रक (केए २२ बी १२१५) हा साताऱ्याकडून पुण्याकडे जात असताना धोकादायक ‘एस’ आकाराच्या वळणावर चालकाचा ताबा सुटून उलटला. तीव्र उतारावरून भरधाव वेगाने आलेला ट्रक उलटल्याने त्याचा चक्काचूर झाला.
या अपघातात ट्रकचालक इस्माइल मोहंमदहनीफ तटगर (वय ५३) व क्लीनर सतीश रघुनाथ जोशी (रा. यमकनमर्डी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) हे दोघे जागीच ठार झाले. बेळगावहून कार्डशीट आणि कागद घेऊन हा ट्रक मुंबईला निघाला होता. अपघातानंतर परिसरात कागदांचे गठ्ठे रस्त्यावर आणि दरीत इतस्तत: विखुरले होते.
अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक शेळके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. क्रेनच्या साह्याने ट्रक उचलून मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातामुळे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. प्रभाकर भानुदास सोनवणे यांनी अपघाताची खबर दिली. (प्रतिनिधी)