दोन वस्तींमध्ये ‘जलयुक्त’ची लक्ष्मणरेषा
By Admin | Updated: April 28, 2015 00:19 IST2015-04-27T22:44:25+5:302015-04-28T00:19:38+5:30
बांध घातल्यामुळे दळणवळण ठप्प : बागलवस्ती, बोडके वस्तीतील ग्रामस्थ आक्रमक; सात वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा

दोन वस्तींमध्ये ‘जलयुक्त’ची लक्ष्मणरेषा
विठ्ठल नलवडे - कातरखटाव--कातरखटाव पासून दीड किलोमीटरवर असलेल्या बागलवस्ती व बोडकेवस्तीचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत ‘जलयुक्त शिवार’ अभियानअंतर्गत बागलवस्ती येथे शेतात बांध घातला असल्यामुळे दोन्ही वस्त्यांचा दळणवळणाचा प्रश्न आणखीनच बिकट झाला आहे. वाहतूक ठप्प असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कातरखटाव येथील बोडकेवस्ती व बागलवस्ती गेल्या आठ वर्षांपासून रस्त्याची मागणी करीत आहेत. वांरवार मोजणी, तहसीलदारांचा निकाल होतोय, प्रांताकडे प्रस्ताव दिला आहे, पुढच्या महिन्यात मोजणी होणार आहे, या लपंडावात या रस्त्याचे काम आजतागायत झाले नाही. सध्या बागल वस्तीवर पंचवीस घरे आहेत व बोडके वस्तीवर जवळपास पन्नास घरे आहेत. दोन्ही वस्तींची सहाशेच्या आसपास लोकसंख्या आहे. शासनाने ‘जलयुक्त शिवार’ अभियानाची काम खेडोपाडी मार्गी लावण्याचा सपाटा लावाला आहे. कातरखटाव परिसरातही ‘जलयुक्त’ची कामे जोमात सुरू आहेत.मात्र, बोडके वस्ती व बागल वस्ती जवळ एका शेतात बांध घातल्यामळे दोन्ही वस्त्यांची दळणवळणाची कोंडी झाली आहे. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने ग्रामस्थांना अनेक अचडणींना सामोरे जावे लागत आहे. या बाबत प्रशासनाने लक्ष घालून बागल ग्रामस्थांची होणारी ससेहोलपट थाबंवावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्याविना ग्रामस्थांची परवड
बोडके वस्ती व बागल वस्तीत राहणाऱ्या ग्रामस्थांची रस्त्याविना मोठी परवड होत आहे. साधे माचीस आणायचे झाले तरी गावात गेल्याशिवाय पर्याय नाही. शालेय मुलांनाही गावात चालत पायवाटेने जावे लागते. पावसाळ्यात सर्वत्र चिखल होत असल्याने ग्रामस्थांची चांगलीच दमछाक होते. आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेताना ग्रामस्थांच्या पुढे असंख्य प्रश्न उभे राहतात.
उपोषणाचा इशारा
रस्त्यासंदर्भात बोडके वस्ती व बागल वस्तीतील ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊनसुद्धा हा प्रश्न जैसे थे आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल न घेतल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा बागल वस्तीच्या ग्रामस्थांनी दिला आहे.