शौचालयाच्या टाकीत पडून दोन भावंडांचा मृत्यू
By Admin | Updated: April 26, 2015 01:02 IST2015-04-26T00:59:27+5:302015-04-26T01:02:59+5:30
शेंद्रेतील घटना : घरमालकावर गुन्ह्याची मागणी

शौचालयाच्या टाकीत पडून दोन भावंडांचा मृत्यू
सातारा : घरासमोर खेळत असताना शौचालयाच्या टाकीत पडून दोन भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शेंद्रे (ता. सातारा) येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजता घडली. या घटनेमुळे शेंद्रे येथे प्रचंड खळबळ उडाली असून, संबंधित घरमालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे.
संकेत नरेंद्र तिगाडे (वय ४), समर्थ नरेंद्र तिगाडे (५, सध्या रा. आदर्श कॉलनी, शेंद्रे, ता. सातारा. मूळ रा. व्हन्नूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) अशी शौचालयाच्या टाकीत पडून मृत्युमुखी पडलेल्या भावंडांची नावे आहेत. या मुलांचे वडील नरेंद्र तिगाडे हे गेल्या एक वर्षापासून शेंद्रे येथे वास्तव्यास आहेत. लिंबखिंड येथील क्रशरवर ते ट्रॅक्टरचालक म्हणून काम करतात. शेंद्रे येथे ते भाड्याची खोली घेऊन राहत आहेत. त्यांच्या घरासमोर अर्धवट बांधकाम केलेले घर आहे. या घराच्या पाठीमागे तीन शौचालयाच्या टाक्या आहेत.
या टाक्यांवर सुरक्षेसाठी झाकण ठेवण्यात आले नव्हते. तिगाडे यांची मुले संकेत आणि समर्थ हे दोघे शनिवारी सायंकाळी घरासमोर खेळत होते. तर त्यांची आई यल्लावा या घरामध्ये पाणी भरत होत्या. घरातील कामे आटोपून मुले कुठे गेली, हे पाहण्यासाठी त्या बाहेर आल्या; परंतु त्यांना दोन्ही मुले कुठेच दिसली नाहीत. शेजारील एका लहान मुलाला त्यांनी विचारले असता, त्या मुलाने संकेत टाकीत पडल्याचे सांगितले. हे ऐकून त्या धावतच टाकीजवळ गेल्या. त्यावेळी संकेत टाकीत पाण्यावर तरंगत होता. संकेतला तत्काळ बाहेर काढून त्यांनी आरडाओरडा केला. आजूबाजूचे लोक त्यांच्या मदतीला धावून आले.
संकेतला शेंद्रेतीलच एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. परंतु समर्थ सुद्धा त्याच टाकीमध्ये पडला आहे का, हे कोणालाही माहिती नव्हते. दोन्ही मुले एकाच टाकीत पडली असावीत, अशी लोकांना शंका आल्याने त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी टाकीच्या तळामध्ये समर्थही सापडला. दोघेही मुले बेशुद्ध पडली होती. तेथील लोकांनी नंतर दोघांनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. (प्रतिनिधी)
दोन दिवसांत दुसरी घटना
मेढा, (ता. जावळी) येथील गांधीनगर वसाहतीत शौचालयाच्या टाकीत पडून विनायक विकास मोरे (वय २) या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता, तर त्याची बहीण विद्या मोरे (३) ही गंभीर जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच शेंद्रे येथील संकेत आणि समर्थ या भावंडांचा मृत्यू झाल्याने मेढा येथील घटनेला उजाळा मिळाला.