प्रेमीयुगुलांना लुटणार्या दोघांना अटक
By Admin | Updated: May 25, 2014 00:32 IST2014-05-25T00:28:21+5:302014-05-25T00:32:54+5:30
दोघांना बारामती दिले वाई पोलिसांच्या ताब्यात

प्रेमीयुगुलांना लुटणार्या दोघांना अटक
वाई : वाई-पाचगणी दरम्यान घाटात प्रेमीयुगुलांना लुटणार्या टोळीतील दोघांना बारामती येथून वाई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयात हजर केल्यावर त्यांना दि. २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाई-पाचगणी घाटात नागेवाडी फाटा दरम्यान प्रेमीयुगुलांना धमकावून लुटणारी एक टोळी कार्यरत होती. याप्रकरणी पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू होता. मागील एका गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीच्या नंबरवरून पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. त्यातील संशयित आंबादास तायप्पा पवार (वय २४, रा. वालचंदनगर चिखली, ता. इंदापूर) आणि अक्षय बाबूराव जाधव (वय २०, रा. मळद, ता. बारामती) यांची माहिती घेतली असता त्यांना बारामती तालुका पोलिसांनी दुसर्या एका गुन्ह्यात अटक केल्याचे समजले. त्यावरून शुक्रवारी रात्री बारामती पोलिसांकडून या दोघा संशयितांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांना न्यायालयात हजर केल्यावर दि. २७ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली. पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली छगन शेडगे, बापूराव धायगुडे, जितेंद्र कांबळे, विक्रम कणसे यांनी ही कारवाई केली. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र माळवे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)