सातारा : मंत्रालयात ओळख असून, आरोग्य विभागात नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून नऊ मुलांची २० लाख २५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष सदाशिव सुतार (रा. सणबूर, ता. पाटण) व महेश गंगाराम बंदरे (रा. नवी मुंबई) यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत वैजनाथ भालचंद्र आचपळ (रा. कापडगाव, ता. फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची दोघा संशयितांशी ओळख झाली होती. यावेळी त्यांनी आमची मुंबई येथे मंत्रालयात ओळख आहे, आरोग्य विभागात मुलांना नोकरीला लावतो, असे आमिष दाखविले होते. मुलाला नोकरी लागेल, या आशेने त्यांनी मुले मिलिंद व उमानंद आचपळ यांच्या नोकरीसाठी पैसे भरले.तसेच अजित किसन कचरे, राहुल बबन धायगुडे, सागर विठ्ठल पडळकर, साईराज शिवाजी वाघमोडे, सूर्यकांत निवृत्ती जाधव, शैलेश शिरीष क्षीरसागर, शुभम ज्ञानेश्वर कुंभार या मुलांना याची माहिती दिली. कायमस्वरूपी नोकरी मिळेल, या आशेने या सर्वांनी एकूण २० लाख २५ हजार रुपये दोघा संशयितांकडे जमा केले.यानंतर १० मार्च २०२० ते जुलै २०२३ या कालावधीत त्यांनी वेळोवेळी कापडगाव (ता. फलटण), सातारा बसस्थानक व मुंबई येथे संशयितांकडे पैसे जमा केले. परंतु, पैसे दिल्यानंतर त्यांनी नोकरी लावली नाही, तसेच पैशांची मागणी केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने आचपळ यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
मंत्रालयात ओळख, नोकरीच्या आमिषाने २० लाखांचा गंडा; साताऱ्यात दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 15:28 IST