कुडाळला आणखी दोन कोंबड्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:04+5:302021-02-05T09:10:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जावळी तालुक्यातील कुडाळला तीन दिवसांपूर्वी मृत कोंबड्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर सोमवारी पुन्हा दोन ...

कुडाळला आणखी दोन कोंबड्यांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जावळी तालुक्यातील कुडाळला तीन दिवसांपूर्वी मृत कोंबड्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर सोमवारी पुन्हा दोन कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. कोंबड्यांचे नमूने बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी पाठविले असून, अहवालाची प्रतीक्षा आहे. तसेच चार ठिकाणच्या मृत कावळ्यांचा अहवालही अजून प्राप्त झालेला नाही.
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात माण तालुक्यातील दोन गावांत, तर खंडाळा आणि कऱ्हाड तालुक्यातील प्रत्येकी एका गावात मृत कोंबड्या आढळून आल्या होत्या. यामधील खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडीमधील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. कऱ्हाड तालुक्यातील हणबरवाडी आणि माणमधील हिंगणी व बिदालमधील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. खटाव तालुक्यातील कटगुणमध्ये काही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या कोंबड्यांचा मृत्यू मुंगसाच्या हल्ल्यात झाल्याचा संशय आहे. येथील नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
जावळी तालुक्यातील कुडाळ येथे तीन दिवसांपूर्वी मृत कोंबड्या आढळल्या. त्यामुळे मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. असे असतानाच सोमवारीही कुडाळला दोन कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्यामुळे येथील मृत कोंबड्यांचा अहवाल आल्यानंतरच बर्ड फ्लूविषयी अधिक भाष्य करता येणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील शिरवळ, भिलार, मलवडी आणि तडवळेमधील मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या नमुन्यांची प्रतीक्षा आहे.
.....................................................