दोन महिन्यांपासून ग्रामस्थांचा घसा कोरडा
By Admin | Updated: February 18, 2015 23:45 IST2015-02-18T22:50:12+5:302015-02-18T23:45:06+5:30
आवळेपठार, गारवडीत पाणीटंचाई : टॅँकर सुरू करण्याबाबत प्रशासन मात्र उदासीन

दोन महिन्यांपासून ग्रामस्थांचा घसा कोरडा
केशव जाधव - पुसेगाव आवळेपठार, गारवडी, ता. खटाव येथे गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची लेखी मागणी जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, प्रशासन एकमेंकाकडे बोटे दाखवत टोलवाटोलवी करत आहे. पिण्याचा टँकर तत्काळ सुरू न झाल्यास या निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
गारवडी, ता. खटाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आवळेपठार वस्ती आहे. ही वस्ती ही खटाव-माण तालुकांच्या डोंगरावर असून, याठिकाणी सुमारे १५० ते १७५ लोकसंख्या आहे. याठिकाणी सामुदायिक विहीर आहे, जून ते डिसेंबर या कालावधीत या विहिरीत छोटी मोटार टाकून सुमारे १० ते १५ हजार लिटर क्षमतेच्या असलेल्या टाकीत पाणी साठवले जाते. येथूनच सर्व ग्रामस्थ पाणी नेत असतात. गेल्या दोन महिन्यांपासून आवळेपठार येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावा, यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, प्रांत, खटाव-माण तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी मागणी केली. मात्र, आवळेपठार हे खटाव हद्दीत येत असले तरी त्याला रस्ता हा माण तालुक्यातून आहे. पिण्याच्या पाण्याचा तत्काळ टँकर सुरू करून पाणी टंचाई दूर करावी, याकरिता प्रशासन कार्यालयामध्ये वेळोवेळी गेल्यानंतर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडून टोलवाटोलवी व उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्रामस्थांना वेठीस धरत आहेत तसेच दुष्काळग्रस्त जनतेच्या भावनांशी खेळत आहेत. पाणी टॅँकर सुरू न केल्यास या निष्क्रिय प्रशासनाच्या कारभारा विरोधात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
अधिवेशनात आवाज उठविणार : शिंदे
आवळेपठार येथे गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. येथील महिला व ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. म्हणूनच स्वखर्चाने पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू केला आहे. मात्र, पाणी टंचाईच्या काळातही जिल्ह्यातील प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत कामात हालगर्जीपणा करत आहे. यासंदर्भात विधानसभेच्या यार्च अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले.