दोन महिन्यांत १३ कोटी वसूल !
By Admin | Updated: March 25, 2016 00:02 IST2016-03-24T22:28:43+5:302016-03-25T00:02:35+5:30
टार्गेटला दोन कोटी बाकी : सुटीच्या दिवशीही पालिकेचे कर्मचारी कामावर

दोन महिन्यांत १३ कोटी वसूल !
सातारा : थकबाकीदारांकडून यंदा पालिकेने विक्रमी थकबाकी वसूल केली असून, केवळ दोन महिन्यांत तब्बल १३ कोटी पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. सध्या सलग सुट्या असतानाही पालिकेतील सुमारे ३५ अधिकारी व कर्मचारी कामावर हजर आहेत. नेहमीप्रमाणेच वसुली आणि संगणक विभाग गुरुवारी कार्यरत होता.
घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकीदारांची संख्या यंदा जास्त आहे. त्यामुळे वीस कोटींहून अधिक रकमेची थकबाकी वसूल करणे पालिकेसमोर मोठे आव्हान होते. फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यातच वसुली मोहीम सुरू झाली होती. जप्ती पथक दारात आल्यानंतर अनेकांची चांगलीच तंतरू लागली. त्यामुळे थकबाकीदारांनी वसुली पथक दारात आल्यानंतर लगेच थकबाकी जमा केली. बड्या धेंड्यांकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप वसुली विभागावर झाला; मात्र वसुली विभागानेच अशा आरोपांकडे कानाडोळा करून आपली मोहीम सुरूच ठेवली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पायाला भिंगरी बांधून वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. एका दिवसात तब्बल दहा लाख रुपये वसूल करण्याचा विक्रमही सातारा पालिकेने आपल्या नावावर केला आहे. ही मोहीम सुरू होऊन दोन महिने पूर्ण होण्यापूर्वीच तब्बल १३ कोटींची थकबाकी वसूल करण्यात पालिकेच्या वसुली विभागाला यश आले आहे. परंतु अद्यापही काही जणांकडे मोठ्या रकमेची थकबाकी आहे. अशा लोकांकडे रोज पाठपुरावा करून थकबाकी वसूल केली जात आहे. सध्या सलग चार दिवस सुट्या असतानाही या कर्मचाऱ्यांनी सुट्या घेतल्या नाहीत. नेहमीप्रमाणेच कामावर येऊन वसुलीची मोहीम सुरू ठेवली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये ठरविण्यात आलेले वसुलीचे टार्गेट पूर्ण होण्यास आता दोन कोटी बाकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, एप्रिल महिन्यामध्ये घरपट्टीधारकांच्या हरकती येणार आहेत. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आणखी थकबाकी चांगली वसूल होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांना आहे. (प्रतिनिधी)
उद्दिष्ट पूर्ण होईल
वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आमचे सर्व अधिकारी व कर्मचारी सुटीच्या दिवशीही कामावर हजर आहेत. येत्या काही दिवसांत उर्वरित दोन कोटींची थकबाकीही वसूल होईल.
- अंबादास वणवे,
वसुली अधीक्षक,
सातारा पालिका