बनवडीतील दोन सावकारांना अटक
By Admin | Updated: May 9, 2017 00:07 IST2017-05-09T00:07:01+5:302017-05-09T00:07:01+5:30
बनवडीतील दोन सावकारांना अटक

बनवडीतील दोन सावकारांना अटक
कऱ्हाड : पार्ले, ता. कऱ्हाड येथील शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी दोन खासगी सावकारांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दोघांनाही सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
विकास हणमंतराव जाधक व सुरेश भिकोबा पवार (दोघे रा. बनवडी) अशी पोलिसांनी अटक केलेल्या सावकारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्ले येथील रमेश नलवडे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रमेश नलवडे हे बुधवारी, दि. ३ सकाळी सात वाजण्याच्या सुमारास जनावरांना वैरण आणण्यासाठी घरातून शिवारात गेले होते. वैरणीसाठी त्यांनी दोरीही सोबत नेली होती. मात्र, दुपारी बारा वाजले तरी ते घरी आले नाहीत. म्हणून त्यांचा मुलगा शेतात गेला. त्यावेळी रमेश नलवडे यांचा मृतदेह सुबाभळीच्या झाडाला लटकत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. कर्जाला कंटाळून रमेश नलवडे यांनी आत्महत्या केल्याचे पोलिस तपासातून समोर आले. नलवडे यांच्यावर पतसंस्था, सोसायटी तसेच खासगी सावकारांचे कर्ज होते. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. रमेश यांनी आत्महत्येपूर्वी काही दिवस अगोदर रात्री संबंधित सावकार त्यांच्या घरी आले होते. त्यांनी नलवडे यांना दमदाटी केली. ‘व्याजासह पैसे दिले नाहीत तर बघून घेतो,’ असेही ते म्हणाले होते. तेव्हापासून रमेश नलवडे नैराश्यात होते. सावकारांच्या भीतीने ते जास्तीत जास्त वेळ शेतातच थांबत होते, असे पोलिसांनी सांगितले.