लसीचे मिळाले पावणे दोन लाख डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:46 IST2021-09-17T04:46:49+5:302021-09-17T04:46:49+5:30
सातारा : जिल्ह्याला प्रथमच कोरोना लसीचे १ लाख ८२ हजार ४८० डोस मिळाले आहेत. यामुळे कोरोना लसीकरणाला वेग येणार ...

लसीचे मिळाले पावणे दोन लाख डोस
सातारा : जिल्ह्याला प्रथमच कोरोना लसीचे १ लाख ८२ हजार ४८० डोस मिळाले आहेत. यामुळे कोरोना लसीकरणाला वेग येणार आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन सुरू केले आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रे आणि काही खासगी रुग्णालयांत ही सुविधा सुरू झाली.
१ मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या ११ लाखांहून अधिक आहे. त्याचबरोबर सवा नऊ लाखांवर ४५ वर्षांवरील कोरोना लस लाभार्थी आहेत.
जिल्ह्याला लस उपलब्ध होईल त्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. त्यासाठी ४०० हून अधिक केंद्रांत सुविधा आहे. या ठिकाणी रोटेशनप्रमाणे नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येते. त्यामुळे दररोज काही केंद्रेच सुरू असतात. पण, गुरुवारी जिल्ह्याला कोरोना लसीचे तब्बल १ लाख ८२ हजार ४०० डोस उपलब्ध झाले. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात लस मिळालेली आहे. यामध्ये कोविशिल्डचे १ लाख ७० हजार तर कोवॅक्सिनचे १२,४८० डोस उपलब्ध झाले आहेत. यापूर्वी ७ सप्टेंबरला जिल्ह्याला सर्वाधिक १ लाख ४७ हजार डोस मिळाले होते. त्या वेळी महालसीकरण मोहीम राबविण्यात आली. तेव्हा एका दिवसात तब्बल १ लाख १९ हजार नागरिकांना लस देण्यात आली. हा एक विक्रम ठरला होता.
..................................................................