कृष्णा च्या दोन कर्मचाऱ्यांना अटक
By Admin | Updated: April 27, 2017 21:49 IST2017-04-27T21:49:45+5:302017-04-27T21:49:45+5:30
कृष्णा कारखान्यातील बोगस कर्जप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना कऱ्हाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. बुधवारी रात्री उशिरा

कृष्णा च्या दोन कर्मचाऱ्यांना अटक
आॅनलाईन लोकमत
कऱ्हाड, दि. 27 - कृष्णा कारखान्यातील बोगस कर्जप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना कऱ्हाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. दोघांनाही न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दामाजी कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक नलवडे यांनाही गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनाही दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
राहुल हिंदुराव देसाई (रा. शिरटे, ता. वाळवा) व संभाजी सीताराम भंडारे (रा. कोळेवाडी, ता. कऱ्हाड) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. कृष्णा कारखान्यातील बोगस कर्ज प्रकरणाच्या आरोपावरून यापूर्वीच माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. १५ एप्रिल रोजी पोलिसांनी याप्रकरणी कऱ्हाडसह वाळवा तालुक्यात माजी संचालकांच्या घरांवर एकाचवेळी छापे टाकले. त्यावेळी आठजण पोलिसांच्या हाती लागले. संबंधित आठजणांना पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता चौघांना पोलिस प्रक्रिया राखून ठेवून प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर चौघांना दि. १८ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानंतर कोठडीची मुदत संपल्याने संबंधित आठही माजी संचालकांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी यापूर्वी न्यायालयीन कोठडी सुनावलेल्यांना दि. २१ पर्यंत पोलिस कोठडी तर इतरांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
काही दिवसांपूर्वी या प्रकरणात कृष्णा कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक व सध्या दामाजी कारखान्यात कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत असलेल्या अशोक नलवडे यांना अटक करण्यात आली. त्यांनाही प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. बुधवारी रात्री याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.