अपहारप्रकरणी दोन ग्रामसेवक बडतर्फ
By Admin | Updated: January 23, 2015 23:34 IST2015-01-23T23:04:59+5:302015-01-23T23:34:21+5:30
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा निर्णय : आयुक्तांच्या खातेनिहाय चौकशीत दोषी

अपहारप्रकरणी दोन ग्रामसेवक बडतर्फ
सिंधुदुर्गनगरी : ग्रामपंचायतीमध्ये विविध ठिकाणी सेवा करताना लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आयुक्तांकडील खातेनिहाय चौकशीत चेंदवण येथील ग्रामसेवक बी. आर. मेस्त्री आणि आवळेगाव येथील निलंबित ग्रामसेवक एम. बी. तांबे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी आज, शुक्रवारी सेवेतून बडतर्फ केले आहे. दरम्यान, विविध आर्थिक अपहारांत अडकलेल्या अन्य नऊ ग्रामसेवकांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही ‘बडतर्फ’ची कारवाई होणार आहे.जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये आर्थिक अपहार केल्याप्रकरणी ११ ग्रामसेवकांच्या खातेनिहाय चौकशीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला होता. त्यापैकी आवळेगाव ग्रामपंचायतीचे निलंबित ग्रामसेवक एम. बी. तांबे
यांच्यावर पूर्वी विविध ग्रामपंचायतींत आर्थिक अपहार केल्याप्रकरणी तीनवेळा निलंबनाची कारवाई केली होती; तर एकवेळा जिल्हा परिषद प्रशासनाने बडतर्फही केले होते. मात्र, शासनाने सहानुभूती दाखवत तांबे यांना पुन्हा सेवेत घेतले होते. या प्रकरणी ग्रामसेवक तांबे व मेस्त्री यांच्या खातेनिहाय चौकशीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवून दोषारोपपत्र ठेवले होते. आयुक्तांनी केलेल्या चौकशीत दोषी आढळल्याने ग्रामसेवक एम. बी. तांबे आणि बी. आर. मेस्त्री यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी सेवेतून कमी केले. (प्रतिनिधी)
यापूर्वीही कारवाई
चेंदवण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बी. आर. मेस्त्री यांना यापूर्वी आर्थिक अपहारप्रकरणी दोनवेळा निलंबित केले होते. त्यांच्या कामकाजात सुधारणाही होत नव्हती आणि विविध ग्रामपंचायतींत सेवा देत असताना त्यांनी लाखो रुपयांचा आर्थिक अपहार केला होता.