कोयनानगरचे दोन कारंजे बंद
By Admin | Updated: February 9, 2015 00:48 IST2015-02-08T21:36:02+5:302015-02-09T00:48:33+5:30
पर्यटनस्थळ अस्वच्छ : सुशोभीकरणात पुढाकार घेण्याची मागणी

कोयनानगरचे दोन कारंजे बंद
कोयनागर : पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयनानगरला सध्या विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यातीलच एक म्हणजे येथील दोन कारंजे, तेही मागील वर्षीपासून बंद व अस्वच्छ अवस्थेत आहेत.कोयनानगर येथे येणाऱ्या पर्यटकांच्या स्वास्थ्यासाठी बसस्थानक जवळ एक आणि प्रकल्प कार्यालयाजवळ एक असे दोन कारंजे बांधलेले आहेत. पण, सध्या हे दोन्ही कारंजे बंद व अस्वच्छ अवस्थेत आहेत. कारंजे बंद का, आहेत याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता डेंग्यूच्या साथीमुळे हे कारंजे बंद ठेवण्यात आले, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
या उलट कोयनानगरच्या जुने मार्केट येथील शिवाजी क्रीडांगण जवळील ड्रेनेजमधील पाणी मोठ्या प्रमाणात वाहत जाऊन ते थेट क्रीडांगणात जाऊन तेथे डबके साठत आहे. तर मग संबंधित अधिकाऱ्यांनी कारंज्याबाबत केलेले वक्तव्य येथे का लागू होत नाही. तसेच ड्रेनेजच्या या वाहत्या पाण्याकडे का दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात
आहे. (वार्ताहर)