दोन दशकांचा वनवास संपला
By Admin | Updated: April 6, 2016 23:49 IST2016-04-06T21:54:07+5:302016-04-06T23:49:51+5:30
महाबळेश्वर : जिजामाता, गृहनिर्माण संस्थेच्या रस्त्याला हिरवा कंदील

दोन दशकांचा वनवास संपला
महाबळेश्वर : अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित असलेल्या जिजामाता व मुन्नवर गृहसंस्थेकडे जाणाऱ्या जोड रस्त्यास महसूल व वनखात्याकडून परवागी मिळाली. वनखात्याच्या अनेक अग्निदिव्यातून दोन्ही गृहनिर्माण संस्थेचे सभासद अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत होते आ. मकरंद पाटील, नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल व नगरसेवक कुमार शिंदे यांच्या प्रयत्नास यश आल्याने या दोन्ही गृहसंस्थेमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
जिजामाता व मुन्नवर गृहनिर्माण संस्थेच्या स्थापनेपासून येथील रस्त्याचा प्रश्न जैसे थे होता; मात्र वनखात्याच्या अनेक अडचणी येऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले होते. माजी उपनगराध्यक्षा छाया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आ. शिंदे यांना भेटल्यानंतर रस्त्याबाबतचा रितसर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आ. शिंदे यांनी केल्या होत्या.
याबाबत विद्यमान नगरसेवक कुमार शिंदे यांनी भोपाळ, मुबंई येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फेब्रुवारी २०१६ मध्ये या संदर्भातील गरज व खुलासा देण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. दरम्यान, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आ. मकरंद पाटील यांनी नागरिकांची बाजू प्रधान सचिवांकडे मांडून त्यांचे समाधान केले.
शासन व वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी महाबळेश्वर परिसर पर्यावरण दृष्टीने संवेदनशील असल्याने उच्चस्तरीय पर्यावरण संरक्षण समित्यांशी चर्चा करून शासनाने वनखात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी अंतिम चर्चा करून त्यांच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला. मुख्यमंत्री व मुख्यसचिव प्रवीण परदेशी यांच्या चर्चेनंतर प्रस्तावास मान्यता देण्यात आली. नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल व नगरसेवक कुमार शिंदे याच्याडे मंजुरीचे पत्र देण्यात आले. नागरिकांनी नगरसेवक कुमार शिंदे यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)
पावसाळ्यापूर्वी काम मार्गी !
जिजामाता व मुन्नवर गृह निर्माण सोसायटी मध्ये ३५० कुंटुबे राहत असून, ५०० मीटर लांब व ६ मीटर रुंद शासन मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे ०.३० हेक्टर ३० गुठे जमीन रस्त्यासाठी नगरपरिषद केंद्र शासनाकडे प्रस्ताव करणार असल्याचे नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांनी सांगून याची जबाबदारी नगरसेवक कुमार शिंदे यांच्यावर सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यासाठी सुमारे ३५ लाख खर्च येणार असून, मंजुरी मिळाल्यानंतर पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे तोष्णीवाल यांनी सांगितले.
रस्त्याचा अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान आहे. या रस्त्याच्या मंजुरीसाठी रामराजे नाईक-निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे यांच्यासह पालिका पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
- कुमार शिंदे, नगरसेवक, महाबळेश्वर पालिका