धार्मिक संस्थानांकडून जिल्ह्याला दोन कोटी!
By Admin | Updated: April 15, 2015 00:19 IST2015-04-15T00:19:15+5:302015-04-15T00:19:15+5:30
विजय शिवतारे : जलयुक्त अभियानासाठी ‘कार्पोरेट’ सहभाग घेणार

धार्मिक संस्थानांकडून जिल्ह्याला दोन कोटी!
सातारा : ‘जलयुक्त शिवार अभियानासाठी कार्पोरेट कंपन्यांचा सहभाग घेतला जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा याठिकाणी मोठे उद्योग उभारले गेले आहेत. एका चांगल्या कामासाठी उद्योगांची सामाजिक जबाबदारी या हेतूने कंपन्यांकडून निधी उभा केला जाईल,’ अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. तसेच ‘जलयुक्त शिवार’ च्या कामासाठी सिध्दीविनायक ट्रस्ट व साई संस्थानने एकूण प्रत्येकी एक कोटी रुपये सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला दिले आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो व जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृती करण्यासाठी जलदिंडी या फिरत्या वाहनांचा प्रारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी झाला. त्यावेळी नियोजन भवनात घेतलेल्या बैठकीत पालकमंत्री बोलत होते. आमदार शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने आदी उपस्थित होते.
सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पालकमंत्री शिवतारे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. पालकमंत्री पुढे म्हणाले, ‘राज्यातील दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. सातारा जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून ३७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नवीन बंधारे बांधण्यासाठी २१ कोटींची तर उर्वरित तरतूद दुरुस्तीसाठी करण्यात आली आहे. या अभियानाला नरेगाची सांगड घालावी. हे अभियान शासकीय कार्यक्रम न राहता चळवळ म्हणून उभी राहावी. या चळवळीतूनच टँकरमुक्त महाराष्ट्र हे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यासाठी संवेदनशील पध्दतीने काम करावे. शासकीय अधिकारी ‘चार्ज’ झाले आहेत. आता नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. पराग सोमन यांनी सुरुवातीला सर्वांचे स्वागत करुन नरेगाबाबत सादरीकरण केले.
याप्रसंगी पाटण प्रांताधिकारी संजीव जाधव, कऱ्हाड प्रांताधिकारी किशोर पवार, वाई प्रांताधिकारी जगदीश खेबुडकर, वाई गटविकास अधिकारी दीपा बापट, तहसीलदार राजेश चव्हाण, वाई तहसीलदार सदाशिव पडदुणे, खंडाळा गटविकास अधिकारी विलास साबळे आदींसह विविध विभागातील कार्यकर्ते कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)