यवतेश्वर घाटात लुटणाऱ्या दोघा तोतया पोलिसांना अटक
By Admin | Updated: September 26, 2015 00:21 IST2015-09-25T22:26:45+5:302015-09-26T00:21:48+5:30
गाडीची कागदपत्र दाखव, आम्ही पोलीस आहोत, असे म्हणून या दोघांनी कारमधील कामगारांना मारहाण केली.

यवतेश्वर घाटात लुटणाऱ्या दोघा तोतया पोलिसांना अटक
सातारा : ‘आम्ही पोलीस आहोत, कागदपत्रे दाखव,’ असे म्हणत एका युवकाला लुटल्याच्या आरोपावरून सातारा तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.सोमनाथ इश्वर साळुंखे (वय ३५, रा. दौलतनगर, सातारा), शंकर कृष्णा निकम (रा. रोहट ता. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सचिन गोरख खवळे (वय ३०, रा. प्रतापसिंह नगर, सातारा) हे बांधकाम व्यवसायिक आहेत. यवतेश्वर येथे एका इमारतीचे काम सुरू आहे. बांधकामावरील कर्मचाऱ्यांसमवेत ते कारमधून गुुरूवारी सायंकाळी पाच वाजता साताऱ्याकडे येत होते. यवतेश्वरजवळील गणेश खिंडीजवळ आल्यानंतर पाठीमागून दुचाकीवरून सोमनाथ साळुंखे आणि शंकर निकम आले. खवळे यांच्या कारला गाडी आडवी मारून कार थांबवली. गाडीची कागदपत्र दाखव, आम्ही पोलीस आहोत, असे म्हणून या दोघांनी कारमधील कामगारांना मारहाण केली. तसेच खवळे यांच्याकडील मोबाईल व २५ हजारांची रोकड काढून घेतली. त्यानंतर दोघांनी तेथून पलायनकेले. खवळे यांनी या प्रकारानंतर थेट सातारा तालुका पोलीस ठाण्यात जाऊन संबंधितांचे वर्णन सांगितले. तसेच खवळे यांचा त्यांनी मोबाईल चोरून नेल्यामुळे पोलिसांनी लोकेशनवरून शोध घेऊन सोमनाथ व शंकरला अटक केली. (प्रतिनिधी)