जिल्ह्यातील अडीच लाख वाहने जाणार भंगारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST2021-02-06T05:12:12+5:302021-02-06T05:12:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : वाढते अपघात व प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने पंधरा आणि वीस वर्षे पूर्ण झालेली वाहने ...

जिल्ह्यातील अडीच लाख वाहने जाणार भंगारात
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : वाढते अपघात व प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने पंधरा आणि वीस वर्षे पूर्ण झालेली वाहने स्क्रॅपमध्ये काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुन्या वाहनधारकाचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात भंगारात जाणारी २ लाख ७९ हजार १७२ वाहने आहेत. ही सर्व वाहने नव्या नियमानुसार भंगारात घालावी लागणार आहेत.
दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: अपघाताला जुनी वाहने कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सुस्थितीत वाहने नसल्यामुळे ब्रेक फेल, स्टेरिंग लॉक, इंजिन नादुरूस्त अशा विविध प्रकारच्या तक्रारी येतात. त्यातच प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत असते. या सर्व बाबी विचारात घेऊन राज्य शासनाने जुनी वाहने स्क्रॅपमध्ये घालण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला असला, तरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अद्याप याबाबत कोणत्याही सूचना अथवा आदेश आलेला नाही. परंतु पंधरा वर्षे पूर्ण झालेली वाहने ज्यांच्याकडे आहेत, अशा लोकांना आता हुरहूर लागली आहे. या वाहनांचे पासिंग पुन्हा होणार का, या विचारात अनेकजण आहेत. अनेक गाड्या तीस ते पस्तीस वर्षे सलग वापरात आहेत. या वाहनांवर कोणी कारवाई करत नाही, असा वाहनचालकांचा समज झाल्यामुळे ते जुनीच वाहने चालवत असल्याचे दिसून येत आहे.
चौकट :
जिल्ह्यातील वाहनांची संख्या
८ लाख ६४ हजार
स्क्रॅपला जाणाऱ्या वाहनांची संख्या
२ लाख ७९ हजार १७२
चौकट : आत्तापर्यंत काय होता नियम
पंधरा वर्षांपर्यंत नवीन वाहन रस्त्यावरून चालविण्यास परवानगी असते. पंधरा वर्षांनंतर पासिंग केल्यास संबंधित गाडीला आणखी पाच वर्षांचा कालावधी वाढवून दिला जातो. त्यानंतर मात्र गाडी कोणतीही असो, ती रस्त्यावर चालवणे गुन्हा आहे. अशा गाड्या स्क्रॅप होतात आणि नंतर भंगारात घालाव्या लागतात.
कोट : जुन्या गाड्या केवळ पंधरा वर्षांपर्यंत वापरता येतात. मात्र, नवीन नियम अद्याप आलेला नाही. शासनाकडून परिपत्रक आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे.
विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा