पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद
By Admin | Updated: August 11, 2014 00:13 IST2014-08-10T23:05:23+5:302014-08-11T00:13:17+5:30
माण तालुका : चारशे किलो तांब्याची तार जप्त

पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद
सातारा : माण तालुक्यातील पालवन येथील डोंगरावरील पवनचक्कीच्या तारा आणि प्लेटा चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. या टोळीकडून तब्बल दहा लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
रमेश किसन मोरे (वय १९), संतोष नथुराम सावंत (वय २१), नानासाहेब पांडुरंग मोरे (वय ३९), सुरेश मारुती मोरे (वय २७), रवींद्र शंकर यादव (वय २३, सर्व रा. मराठवाडी, ता. पाटण), आशपाक बशीर मुलाणी (वय ३८) मोहसीन मनोहर कागदी (वय २७, दोघे रा. शनिवार पेठ, कऱ्हाड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पवनचक्कीच्या तारा आणि प्लेटा चोरणारी टोळी माण तालुक्यातील पिंगळी येथे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या टीमला तेथे तत्काळ रवाना केले. पिंगळी येथील चौकात पोलिसांनी सापळा लावला. सायंकाळी सहाच्या सुमारास दहिवडी बाजूकडून सुमो (एमएच ५० ए १७२८) येत होती. या सुमाला थांबवून पोलिसांनी गाडीची तपासणी केली. त्यावेळी गाडीमध्ये पवनचक्कीच्या तांब्याच्या तारा आणि प्लेटा सापडल्या. या सुमोच्या पाठीमागून दोघे दुचाकीवरून येत होते. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. एकूण सहाजणांना पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून सुमारे ४०० किलो तांब्याच्या तारा, प्लेटा, तारा कट करण्याचे साहित्य असा सुमारे दहा लाखांचा ऐवज जप्त केला. या सर्व आरोपींना दहिवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, सहायक फौजदार सुरेंद्र पानसांडे, पृथ्वीराज घोरपडे, कांतिलाल नवघणे, संजय पवार, मोहन घोरपडे, उत्तम दबडे, प्रवीण फडतरे, संपत वाघ, संजय जाधव यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, माण तालुक्यातील डोंगरावर असणाऱ्या पवनचक्कीच्या ठिकाणी वारंवार चोरीचे प्रकार घडत आहेत. मात्र, काही बोटांवर मोजण्याइतपतच चोऱ्या उघडकीस झाल्या आहेत. त्यामुळे या टोळीकडून पाठीमागील चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
टोळीमध्ये सराईत चोरट्याचा सहभाग
संतोष मोरे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. यापूर्वी त्याने पवनचक्कींच्या साहित्याची चोरी केल्याचे उघड झाले होते. माण तालुक्यातील श्रीपालवन येथील डोंगरावर असलेल्या पवनचक्कीच्या तारा चोरल्याची कबुली या टोळीने दिली असून, आणखी बरेच गुन्हे या टोळीकडून उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.