बावीस फूट उंचीवरील पत्र्यातून मुलांचे पलायन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:23 IST2019-06-28T23:23:14+5:302019-06-28T23:23:19+5:30
सातारा : येथील बालसुधारगृहातून आठ मुले पळून गेली, हा धाडसाचा एक नमुनाच म्हणावा लागेल. कारण, २० ते २२ फूट ...

बावीस फूट उंचीवरील पत्र्यातून मुलांचे पलायन!
सातारा : येथील बालसुधारगृहातून आठ मुले पळून गेली, हा धाडसाचा एक नमुनाच म्हणावा लागेल. कारण, २० ते २२ फूट उंचीवरील पत्रा फोडून बाहेर पडणे सहजासहजी शक्य नाही. मनोरा रचून व बाथरुमच्या दरवाजावर पाय ठेवत हातात हात घेऊन ते बाहेर पडल्याचे स्पष्ट होत आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याचे त्यांच्या पथ्यावर पडले, त्यामुळे दिवसाही पलायन करण्यात ते यशस्वी ठरले.
साताऱ्यातील सदर बझार परिसरात मुला-मुलींचे निरीक्षण, बालगृह, आधार गृह (रिमांड होम) आहे. या ठिकाणी मुलांना शिक्षणासाठी ठेवण्यात येते. तसेच कायदेशीर रखवालीसाठी ठेवले जाते. याच निरीक्षणगृहातूनअवघ्या दोन दिवसांत आठ मुले पळून गेली आहेत. मंगळवारी चार मुले बेपत्ता झाली होती. त्यानंतर दुसºयाच दिवशी म्हणजे बुधवारीही आणखी चार मुलांनी पलायन केले, यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. ही खळबळ उडण्यामागचे दुसरे एक कारण म्हणजे ही मुले रात्री नव्हे तर चक्क दिवसा पळून गेली आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रिमांड होममधील साधारणपणे १५ बाय २० च्या खोलीत मंगळवारी सुमारे १० मुले होती. त्यातील चारजण सायंकाळी चारच्या सुमारास खोलीवरील २० ते २२ फूट उंचीवरील सिमेंटचा पत्रा फोडून बाहेर पडले. हे सर्वजण १५ ते १७ वर्षांच्या दरम्यानचे होते. त्यांनी मनोरा रचून व तेथील बाथरुमच्या दरवाजावर पाय ठेवून पत्र्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्रा काढून ते बाहेर पडले. तर दुसºया दिवशीही चौघाजणांनी पलायन केले. ते तर सकाळी दहाच्या सुमारास हे विशेष.
पहिल्या दिवशी ज्या खोलीतून मुलांनी पलायन केले. तेथील वरील एक पत्रा काढला होता. त्यानंतर तेथे असणाºया सर्व मुलांना शेजारच्या खोलीत हलविले. शिफ्ट केलेल्या खोलीतून चौघेजण निसटले. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास जेवण करत असतानाच त्यांनी हा प्रकार केला. त्यासाठी ते शिफ्ट झालेल्या खोलीतील वरील लोखंडी अँगलवरून प्रथम राहत असणाºया खोलीत गेले. कारण दोन्ही खोल्यांच्या मधील भिंतीवरून दोन्हीकडे जाता येते. त्याठिकाणी पहिल्या दिवशी पलायन केलेल्या मुलांप्रमाणेच हुशारी वापरून त्यांनी फोडलेल्या पत्र्यातूनच बाहेर पडण्याचे धाडस केले.
या निरीक्षणगृहात सुरक्षारक्षक नाहीत. तेथील काळजीवाहकच या मुलांकडे लक्ष ठेवतात. त्यामुळे येथील सुरक्षिततेचा प्रश्न खºया अर्थाने समोर आला आहे. यावर वेळीच विचार करण्याचीही गरज आहे. तरच अशा घटना टाळता येतील.
तीन पथके; आणखी दोघांना पकडण्यात यश
पळून गेलेले सर्वजण १५ ते १७ वयोगटातील असून वाई, खटाव, कोरेगाव तालुक्यांतील रहिवासी आहेत. यामधील एकाला गुरुवारी पकडले होते. तर इतरांच्या मागावर पोलिसांची तीन पथके आहेत. त्यामधील आणखी दोघांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. आता इतर मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.