‘सुंदर माझं घर’स्पर्धेत सव्वाशे कुटुंबांचा सहभाग
By Admin | Updated: October 8, 2015 01:08 IST2015-10-07T23:08:07+5:302015-10-08T01:08:00+5:30
शाहूपुरी माध्यमिक शाळेचा उपक्रम : पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थी गिरवतायत पर्यावरण अन् निती शास्त्राचे धडे

‘सुंदर माझं घर’स्पर्धेत सव्वाशे कुटुंबांचा सहभाग
शाहूपुरी : राष्ट्रीय एकात्मता विकास कार्यसंघ शाहूपुरी सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने संस्थेने ‘आदर्श ग्राम’च्या धर्तीवर शालेय विद्यार्थी व पालकांच्या सहभागातून १५ आॅगस्ट रोजी ‘सुंदर माझं घर’ या संकल्पनेची स्पर्धात्मक पातळीवर घोषणा केली होती. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला असून, सुमारे १२६ कटुंबांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे.
वर्षभराच्या कालावधीत तीन अंतर्गत व एक बाह्य परीक्षणांतर्गत स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण रक्षण, इंधन, वीज, पाणी बचत आदी दहा निकषांवर आधारित असलेल्या निवड प्रक्रियेतील निरीक्षणांचा भाग म्हणून गणेशोत्सव काळात या सर्व कुटुंबांची वेगवेगळ्या तीन समित्यांमार्फत पहिली परीक्षण फेरी नुकतीच पूर्ण झालेली असून, संस्थेमार्फत विद्यालयातील विशेषकरून स्पर्धेतील सहभागी कुटुंबांचे या सर्व निकषांचे पालन योग्य तऱ्हेने होण्यासाठी सहविचार सभा, प्रबोधनात्मक पत्रके, घर भेटी याद्वारे प्रबोधन करण्याचा नियोजनात्मक पद्धतीने प्रयत्नही होत आहेत व याचाच परिणाम म्हणून या स्पर्धेतील सहभागी कुटुंबांपैकी ज्यांचे घरी गणेशोत्सव साजरा होतो, अशांपैकी पन्नास टक्क््यांहून जादा कुटुंबांनी माती, शाडूच्या, इकोफ्रेंडली मूर्तींचा वापर करणे, निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, विजेचा कमीत कमी वापर, थर्माकोल, प्लास्टिक टाळून सजावट करणे, देखाव्यातून सामाजिक प्रबोधन करणे या मुद्द्यांचा पुरेपूर वापर केलेला दिसून येत आहे. तसेच कुटुंबातील सर्व लहान, थोर घटकांची अशा रितीने गणेशोत्सव साजरा करण्याची मानसिकता तयार होणे हेच या स्पर्धेचे प्राथमिक यश आहे.
यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे, विद्यार्थ्यांबरोबरच संस्था व विद्यालय पातळीवरील पदाधिकारी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव व या स्पर्धेतील दहा निकषांचे वैयक्तिक घरांच्या पातळीवर पालन करण्याच्या दृष्टीने या गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकजुटीने पाऊल टाकले असून, विद्यालयातील मातीच्या श्रीगणेशाचे विसर्जनही क्रीडांगणावर विद्यार्थ्यांनी एका मोठ्या पिंपात विधिवत करून बाप्पांना निरोप दिला.
विद्यालयाच्या जागेत खणलेल्या एका खड्ड्यात सर्व निर्माल्य खतासाठी टाकण्यात आले व याचा उपयोगही विद्यालयाचा शेतकरी संघ करणार आहे. विसर्जनानंतरचे पाणी, फुलशेती व शेतकरी संघाच्या शेतीसाठी वापरण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांवर वेगळे संस्कार होत आहेत. आहे. (प्रतिनिधी)
प्रत्येक विद्यार्थी बनला दूत...!
शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग नोंदवून घेण्यासाठी काही विशेष उपक्रमांचे आयोजन केले आहे. समाजाभिमुख विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांच्यातील सामाजिक जाणीवा जागृत करणे आवश्यक आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थी दूत म्हणून शाहूपुरी परिसरात वावरत आहे. सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.