दीडशे सातारकरांना दूधवाटप : अंनिस, परिवर्तन, विवेक वाहिनीचा उपक्रम
By Admin | Updated: January 1, 2015 00:01 IST2014-12-31T23:11:04+5:302015-01-01T00:01:38+5:30
‘दारू नको, दूध प्या’ उपक्रम

दीडशे सातारकरांना दूधवाटप : अंनिस, परिवर्तन, विवेक वाहिनीचा उपक्रम
सातारा : थर्टीफर्स्ट डिसेंबरला पार्ट्या, मद्यप्राशन यामुळे अपघात आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. या साऱ्याला फाटा देण्यासाठी परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विवेक वाहिनी यांच्या वतीने चक्क दूध वाटण्यात आले. सुमारे दीडशे व्यक्तींनी दूध पिऊन ‘थर्टीफर्स्ट’ साजरा केला. ‘दारू नको, दूध प्या’ उपक्रम या संस्थांच्या वतीने राबविण्यात आला. ‘दारूमुक्त सेलिब्रेशन’चा आग्रह धरून राजवाडा येथील जवाहर बागेसमोर युवक-युवती उभ्या राहिल्या होत्या. येणाऱ्या-जाणाऱ्याला मोफत दूध पिण्यास देऊन त्यांनी व्यसनविरोधी प्रबोधन केले. सायंकाळी साडेपाच ते साडेसात असे दोन तास हा उपक्रम सुरू होता.
‘खाणार नाही गुटखा, पिणार नाही बिअर, हॅपी न्यू इयर,’ ‘नो चिअर, नो बिअर, ओन्ली हॅपी न्यू इयर’ अशा घोषणांनी राजवाडा परिसर दुमदुमला होता. सातारकरांनीही या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला. परिवर्तन संस्थेचे डॉ. हमीद दाभोलकर, किशोर काळोखे, उदय चव्हाण, ‘अंनिस’चे प्रशांत पोतदार, विवेक वाहिनीचे वल्लभ वैद्य आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)