चोवीस तास पाणी योजनेची अवस्था गंभीर !
By Admin | Updated: November 20, 2015 00:05 IST2015-11-19T22:04:10+5:302015-11-20T00:05:06+5:30
जीवन प्राधिकरणाचा कारभार : नगरसेवक आक्रमक; ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या ठरावास मंजुरी --कऱ्हाड पालिका सभा

चोवीस तास पाणी योजनेची अवस्था गंभीर !
कऱ्हाड : कऱ्हाड शहरात पालिकेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या चोवीस तास पाणी योजनेचे काम अपूर्णावस्थेत आहे. योजनेचे काम पूर्ण करण्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून विलंब लावला जात आहे. त्यामुळे चोवीस तास पाणीपुरवठा योजनेची अवस्था गंभीर बनली आहे. योजनेचे काम करत असताना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी अनेक चुका केल्या त्याचा त्रास आता पालिकेला सहन करावा लागत आहे. हे कदापिही सहन करून घेतले जाणार नाही. असे सांगत सर्व नगरसेवकांनी जीवन प्राधिकरणाच्या कारभाराविरोधात प्रशासनावर ताशेरे ओढले.
दरम्यान, यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे बसविण्यात येणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या ठरावास मंजुरी दिली.
कऱ्हाड पालिकेची सर्वसाधारण मासिक सभा पालिका सभागृहात गुरुवारी पार पडली. नगराध्यक्षा अॅड. विद्याराणी साळुंखे अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. सुुरुवातीपासूनच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत चोवीस तास पाणी पुरवठा योजनेच्या कामाला जाणीवपूर्वक विलंब लावला जात आहे. जीवन प्राधिकरणाच्या कामातील चुकांमुळे पालिकेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे सांगत जीवन प्राधिकरणाकडून मागवण्यात आलेल्या मुदतवाढीला मंजुरी देताना त्यांच्यावर निर्बंधही लादले जावे, असे पावसकर यांनी सभागृहास माहिती दिली. तसेच पालिकेत वापरल्या जाणाऱ्या ई-गव्हर्नस संगणक कार्यप्रणालीचा वापर हा शासकीय तत्त्वावर केला जातो आहे, तो खासगी तत्त्वावर करण्यात यावा. या कार्यप्रणालीमध्ये अनेक चुका असून, वाढीव स्वरूपात व्याजातून कर आकारणी केली जात आहे. त्यातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. ती थांबवणे पालिकेची जबाबदारी आहे. कऱ्हाड पालिकेप्रमाणे राज्यातील इतर नगरपालिकांनी देखील शासनाच्या ई-गव्हर्नर कार्यप्रणालीतील वाढीव व्याज कर कमी करण्याबाबत ठराव करावा, अशी मागणी केली.
या योजनेतील कामाबाबत नगरसेवकांनी प्राधिकरणातील अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. ई-गव्हर्नन कार्यप्रणालीबाबत शासनाकडे संबंधीत करवाढीचे अधिकार असून, वेळोवेळी पालिकेमार्फत करवाढ कमी करावा असा प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
शहरातील रस्त्यांचे होणार कारपेटीकरण
शहरातील मुख्य रस्त्यांप्रमाणे अंतर्गत भागातील रस्त्यावर कारपेटीकरण करण्यात येणार असल्याचा निर्णय पालिकेच्या सभेत घेण्यात आला. शहरातील काही रस्त्याचे पॅचवर्कचे काम पूर्ण करण्यात आले, असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी दिली.
अठ्ठावीस महिन्यांचा प्रलंबित विषय मंजुरीसाठी
शहराचे भूषण असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा अशी मागणी अठ्ठावीस महिन्यांपासून करण्यात येत आहे. त्या विषयाला आताच्या सभेमध्ये मंजुरीसाठी घेतल्याने पालिकेच्या प्रशासनाने लवकर आणि चांगला निर्णय घेतला असल्याचे नगरसेवक विनायक पावसकर यांनी सांगितले.