पंचवीस दिवसांनंतर पहिला पोलिस अटकेत !

By Admin | Updated: July 16, 2016 23:29 IST2016-07-16T22:39:18+5:302016-07-16T23:29:10+5:30

‘सीआयडी’ची कारवाई : सात दिवस कोठडी; इतर बारा जणांचा शोध सुरूच - रावसाहेब जाधव खून प्रकरण

Twenty-five days after the first police detention! | पंचवीस दिवसांनंतर पहिला पोलिस अटकेत !

पंचवीस दिवसांनंतर पहिला पोलिस अटकेत !

कऱ्हाड : करमाळा येथील रावसाहेब जाधव या संशयिताच्या खून प्रकरणात तब्बल पंचवीस दिवसांनंतर शनिवारी ‘सीआयडी’च्या पथकाने कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यातील पहिल्या हवालदारास अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
कृष्णा खाडे असे अटक केलेल्या हवालदाराचे नाव आहे. दरम्यान, संशयित रावसाहेब जाधवच्या खून प्रकरणात ‘सीआयडी’ने बाराजणांवर आरोप निश्चीत केल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये पोलिस निरिक्षक विकास धस, सहायक पोलिस निरीक्षक हणमंत काकंडकी, हवालदार दिलीप क्षीरसागर, सुधीर जाधव, राजकुमार कोळी, अतुल देशमुख, नितीन कदम, सुजीत मोहिते, शरद माने, संजय लाटे, अमोल पवार व कृष्णा खाडे यांची नावे आहेत.
कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दाखल असणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी करमाळा येथील रावसाहेब जाधवला ताब्यात घेतले होते. रावसाहेबसह त्याचा मेहुणा अनिल डिकोळे हासुद्धा पोलिसांच्या ताब्यात होता. पोलिस त्या दोघांकडे तपास करीत असताना कार्वेनाका पोलिस चौकीत रावसाहेबची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबत अनिल डिकोळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिस निरीक्षक विकास धस, सहायक पोलीस निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी रावसाहेबला २५ लाखांची मागणी केली होती, असे फिर्यादीत म्हटले होते. मृतदेहाची उत्तरीय तपासणी केलेल्या अहवालातही त्याच्या शरीरावर मारहाण झाल्याचे व्रण आढळले आहेत. दोन्ही वस्तुस्थितीनुसार ‘सीआयडी’ने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. निलंबनाची कारवाई केल्यानंतर अधिकाऱ्यांसह कर्मचारी गायब झाले होते. ‘सीआयडी’ने या सर्वांच्या अटकेची रितसर प्रक्रिया सुरू केली होती. अखेर शनिवारी या प्रकरणात ‘सीआयडी’ने हवालदार खाडेला अटक केली.


अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरावर छापासत्र
पोलिस अधिकाऱ्यांसह एकूण बाराजणांवर रावसाहेबच्या खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. ‘सीआयडी’चे पोलिस उपाधीक्षक एन. एस. जगताप यांच्यासह पथक संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध घेत असून, शुक्रवारीही या पथकाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घरावर छापे टाकले. मात्र, कोणीही पथकाच्या हाती लागले नाही. अशातच शनिवारी कृष्णा खाडे याला पथकाने ताब्यात घेऊन अटक केली.


कृष्णा एक वर्षापासून पोलिस दलात
कृष्णा बाबासाहेब खाडे हा वर्षभरापूर्वीच पोलिस दलात रुजू झाला आहे. रावसाहेब जाधव पोलिसांच्या ताब्यात असताना खाडे हा बीट मार्शल होता. जाधवच्या मृत्यूच्या आदल्या रात्री तो रात्रगस्तीवर होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, त्याचा या गुन्ह्यात किती सहभाग आहे, याबाबतचा खुलासा अद्याप ‘सीआयडी’कडून करण्यात आलेला नाही. मात्र, या प्रकरणात पहिल्यांदाच खाडेला गजाआड व्हावे लागले आहे.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकुरामुळे बसस्थानकात तोडफोड
फलकालाही काळे फासले : शिवसैनिकांवर आरोप
सातारा : व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल झाल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी बसस्थानकातील स्थानक प्रमुख नौशाद तांबोळी यांच्या केबीनची तोडफोड केली. सायंकाळी पुन्हा शिवसैनिकांनी कार्यालयात जाऊन फलकाला काळे फासले. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच अटकाव करून शिवसैनिकांना यापासून परावृत्त केले.
एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहे. या ग्रुपवर तांबोळी यांनी आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केल्याचा आरोप करत दहा ते पंधरा शिवसैनिकांनी शनिवारी दुपारी तीन वाजता बसस्थानक गाठले. तांबोळी यांच्या कार्यालयात जाऊन खुर्ची व टेबलाची तोडफोड केली. हा प्रकार सुरू झाल्यानंतर तांबोळी तेथून निघून गेले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळाला; परंतु सायंकाळी सहा वाजता पुन्हा शिवसेनेचे किशोर पंडित कार्यकर्त्यांसह तांबोळी यांच्या केबीनमध्ये गेले. तेथे तांबोळी त्यांना सापडले नाहीत; मात्र त्यांच्या नोटीस बोर्डावर त्यांनी काळे फासले. हा प्रकार सुरू असताना तेथे पोलिस आले. पोलिसांनी त्यांच्या हातातील बाटली हिसकावण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या अंगावर काळे डाग पडले. (प्रतिनिधी)

नौशाद तांबोळींवर गुन्हा दाखल
बसस्थानकात तोडफोड झाल्याचे एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना समजल्यानंतर अनेकांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, तक्रार कोण देणार, यावर त्यांचे अडून राहिले होते. त्यानंतर एसटी महामंडळातीलच वाहक मंगेश शेलार यांनी तांबोळी यांच्या विरोधात तक्रार दिली. मात्र, ती आक्षेपार्ह्य मजकूर व्हायरल केल्याची.

Web Title: Twenty-five days after the first police detention!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.