मोरणा पठारावर वीस जनावरे दगावली
By Admin | Updated: August 18, 2015 22:30 IST2015-08-18T22:30:57+5:302015-08-18T22:30:57+5:30
बोटोलिझम रोगाचा विळखा : शेतकरी हवालदिल; उपाययोजनेची मागणी

मोरणा पठारावर वीस जनावरे दगावली
पाटण : तालुक्याच्या मोरणा पठारावरील नागवणटके, भाकरमळी, हुंबरणे, आटोली, पांढरेपाणी या दुर्गम गावातील गाई, म्हशी यासारखी पाळीव जनावरे बोटोलिझम या संसर्गजन्य रोगामुळे दगावली जात असून आतापर्यंत सुमारे २० जनावरे दगावल्याच्या घटना येथील शेतकरी सांगत आहेत. हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी मोरगिरी पशु वैद्यकिय दवाखान्याचे कर्मचारी सतत प्रयत्नशिल असूनही रोगाचा जीवघेणा प्रवास सुरुच आहे.गेल्या तीन वर्षापूर्वी मोरणा पठारावर अशाच प्रकारच्या रोगाने थैमान घातले. त्यामुळे शेकडो पाळीव जनावरे मरुन गेली होती. मेलेल्या जनावरांची हाडे इतर पाळीव जनावरांनी चघळल्यामुळे हा रोग जडतो. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तर डोंगरावरील शेतकरी सांगतात की, गेल्या आठ दिवसांपासून आमच्या गायी म्हैसी पोट फुगून मरत आहेत. जनावराचा पाठीमागील भाग लुळा पडत असून एकाच जागेवर धडपडून त्यांचा मृत्यू होत आहे. भाकरमळी येथील दगडू शेळके यांच्या पाच गायी रोगाने मेल्या तर रामू विठू शेळके यांच्या चार गायी बळी पडल्याचे कोंडीबा शेळके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बोटोलिझम हा रोग पसरल्याचे मी पाटण पंचायत समितीच्या सभागृहात बोललो होतो. याचे गांभीर्य पशुवैद्यकीय विभागाला समजले नाही. त्यामुळे मोरणा परिसरातील पाळीव जनावरांचय मृत पावल्याच्या घटना सुरु झाल्या आहेत. याबाबत आता पशुवैद्यकीय विभागाने जिल्हास्तरीय पथक मोरणा पठारावर पाठवावे. अन्यथा जनावरे दगावल्याची नुकसान भरपाई संबंधित यंत्रणेला द्यावी लागेल. यासाठी आमदार शंभूराज देसार्इंच्या माध्यमातून पाठपुरावा करु.
- नथुराम कुंभार,
पंचायत समिती सदस्य
ढेबेवाडी विभागातील पाळशी, पाणेरी येथे पाळीव जनावरांना बोटोलिझमचा आजार सुरु झाला होता. त्यावेळेपासूनच माझ्या कार्यक्षेत्रातील पाळीव जनावरांना प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण सुरु केले होते. अजूनही पाळीव जनावरांना वाचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
- डी. बी. डोईफोडे
सहाय्यक पशुधन वैद्यकीय अधिकारी
मोरगिरी