बाराजणांना सक्तमजुरी
By Admin | Updated: April 28, 2015 23:44 IST2015-04-28T23:33:59+5:302015-04-28T23:44:17+5:30
मारामारी प्रकरण : काळगाव, डाकेवाडी येथे घडल्या होत्या वेगवेगळ्या घटना

बाराजणांना सक्तमजुरी
पाटण : डाकेवाडी, काळगाव व साईकडे या गावांमध्ये अनुक्रमे २००९ आणि २०११ मध्ये झालेल्या वेगवेगळ्या तीन मारामारीच्या घटनांमधील बारा आरोपींना पाटण न्यायालयाने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी की, डाकेवाडी, काळगाव येथे ८ नोव्हेंबर २०११ रोजी यशवंत आण्णा डाकवे यांना शेतात जाणाऱ्या रस्त्यावर गवताच्या मोळ्या का टाकल्या या कारणावरून मारहाण झाली होती. त्यामध्ये ते जखमी झाले होते. याची पाटण न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यानुसार संगीता मस्कर, शिवाजी मस्कर, लक्ष्मण मस्कर, शांताबाई मस्कर यांना दोषी धरून सहा महिन्यांची सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
साईकडे येथे २७ फेब्रुवारी २०११ रोजी दोन गटांत मारामारी झाली होती. या प्रकरणात छगन सकट यांना कुऱ्हाड व दांडक्याने मारहाण केली होती. यामध्ये छगन सकट गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी श्रीरंग सकट, अनिल सकट, अमोल सकट, सतीश सकट, महादेव सकट, श्रीकांत तडाखे यांना एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी अडीच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
तसेच बबन सकट व छगन सकट यांनी भांडणे सोडविण्यास गेलेले श्रीकांत तडाखे यांच्या डोक्यात काठी मारून जखमी केले. त्यामुळे उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून तीन महिन्यांची सक्तमजुरी व एक हजार रुपयांची शिक्षा सुनावण्यात आली. तीन वेगवेगळ्या मारामारीप्रकरणाची सुनावणी पाटण न्यायालयात न्यायाधीश रा. श. भाकरे यांच्यासमोर झाली, अशी माहिती सरकारी वकील संदीप पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. (प्रतिनिधी)