जिल्ह्यात सव्वादोन लाखांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST2021-02-05T09:09:33+5:302021-02-05T09:09:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहीम सुरू असून रविवारी २ लाख ४१ हजारांवर बालकांना डोस देण्यात ...

जिल्ह्यात सव्वादोन लाखांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहीम सुरू असून रविवारी २ लाख ४१ हजारांवर बालकांना डोस देण्यात आला. टक्केवारीत हे प्रमाण ९४ टक्के आहे. तर यासाठी जिल्ह्यात २ हजार ४६९ बुथ कार्यान्वित करण्यात आले होते. पुढील तीन दिवसांत घरोघरी जात माहिती घेऊन बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे.
१९९५ पासून पल्स पोलिओ मोहीम सुरू झाली. २१ वर्षांपासून सातारा जिल्ह्यातही ही मोहीम सुरू आहे. १९९९ पासून जिल्ह्यात पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही. या मोहिमेंतर्गत ० ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना डोस देण्यात येत आहे. जिल्ह्यात ५ वर्षांखालील अंदाजे २ लाख ५४ हजार बालके आहेत. या बालकांना डोस देण्यात येत आहे. यासाठी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि सर्व आरोग्य केंद्रातही डोस देण्यात येत आहेत. तर ग्रामीण भागात २ हजार ३१५ आणि शहरी भागात १५४ असे एकूण २ हजार ४६९ पोलिओ लसीकरण बुथ आहेत. तर १५१ ट्रान्झिट टीम कार्यरत आहेत. या टीम रेल्वे स्टेशन, बसस्थानक आणि टोलनाक्यावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर १६६ मोबाईल बुथ आहेत. या बुथमधील आरोग्य विभागाचे कर्मचारी वीटभट्ट्या, बांधकाम आणि ऊसतोड मजूर असणाऱ्या ठिकाणी जात आहेत.
पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी १४० वैद्यकीय अधिकारी आणि ६ हजार ३६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पर्यवेक्षणासाठी ४८४ जणांची नियुक्ती आहे.
चौकट :
ग्रामीणमध्ये दोन लाखांवर लाभार्थी...
जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी अशा विभागात ही पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात रविवारी २ लाख १४ हजार ६४ बालकांना तर शहरी विभागात २७ हजार ४३७ बालकांना लसीचा डोस पाजण्यात आला.
स्लिपमध्ये लसीकरणाची माहिती...
जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी विभागात सर्व्हे करण्यात आला आहे. १ ते ३० जानेवारी दरम्यान, जन्म झालेल्या सर्व बालकांची नोंदणी आरोग्य कर्मचारी करत आहेत. तसेच ऊसतोड कामगार, वीटभट्टी, बांधकाम, रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांच्याही नोंदी करण्यात येत आहेत. नोंदणी करण्यात आलेल्या बालकांना स्लिपचे वाटप करण्यात येत आहे. या स्लीपवर लसीकरण स्थळ, तारीख आणि वेळ याची माहिती देण्यात आलेली आहे.
फोटो दि.३१सातारा पोलिओ लसीकरण फोटो...
फोटो ओळ : सातारा जिल्ह्यात रविवारी पल्स पोलिओ मोहीम सुरू झाली. यावेळी लहान बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. (छाया : जावेद खान)
......................................................