जंगलात बांधलेली बारा घरं जमीनदोस्त
By Admin | Updated: December 4, 2014 00:45 IST2014-12-04T00:36:47+5:302014-12-04T00:45:03+5:30
महाबळेश्वरात कारवाई : वनविभागाने केली दोघांना अटक; सात वाहने जप्त

जंगलात बांधलेली बारा घरं जमीनदोस्त
महाबळेश्वर : येथून तीन किमी अंतरावर असलेल्या देवी चौकाजवळील दाट जंगलात अतिक्रमण करून विनापरवाना उभारलेली बारा घरे येथील विभागीय वन अधिकारी दादासाहेब शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाने आज सकाळी प्रचंड बंदोबस्तात उद्ध्वस्त केली. या प्रकरणी चंद्रकांत ढेबे व चंद्रकांत डोईफोडे या दोघांना अटक करण्यात आली. तसेच दोन चारचाकी ५ दुचाकी अशी एकूण सात वाहनेही वनविभागाने जप्त केली. या धडक कारवाईमुळे या भागात खळबळ उडाली आहे.
महाबळेश्वर-सातारा मार्गावर असलेल्या देवी चौकाजवळील सर्व्हे क्रमांक १० मधील घनदाट जंगलात मे महिन्यांत येथील काही लोकांनी अतिक्रमण केले होते. साधारणत: १५ ते २० गुंठे क्षेत्रामध्ये वृक्षतोड करून लोखंडी अँगल व पत्रा वापरून घरे उभारली होती. यासंदर्भात वन विभागाने बारा जणांवर गुन्हा नोंद केला होता व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ५३, ५४ नुसार संबंधितांना नोटीस वली होती. तरीही अतिक्रमण काढण्यात न आल्याने वनविभागाने ही कारवाई केली. या कारवाईत मोकळी दोन ते तीन घरे पाडण्यात आली. मात्र काही घरांमध्ये लोक राहत असल्याने त्या घरांवर कारवाई न करता नोटीस बजावण्यात आली होती. वन विभागाच्या नोटीसमध्ये म्हटले होते की, ‘आपण पुढील काही दिवसांत हे अतिक्रमण हटवावे, अन्यथा वनविभागाकडून कारवाई केली जाईल व सर्व माल जप्त करून सरकारजमा करण्यात येईल.’ वन विभागाने केलेल्या आवाहनास येथील लोकांनी प्रतिसाद दिला नाही. उलट तेथे पुन्हा वृक्षतोड करून कूपनलिका काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे वनविभागाने धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
या घेतलेल्या निर्णयानुसार बुधवारी सकाळी कोल्हापूर विभागीय वनसंरक्षक दादासाहेब शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपवनसंरक्षक एन. एम. मोहिते, नीता ढेरे-कट्टे, दीपक खाडे, वनक्षेत्रपाल सूर्यकांत कुलकर्णी, पी. डी. बुधनवार, ए. ए. पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत, वनपाल, वनरक्षक, ४० पोलीस कर्मचारी व ७० वनकर्मचारी एवढा फौजफाटा घेऊन वनविभागाने कारवाईला प्रारंभ केला.
अनेक घरांत राहिणाऱ्या महिला व मुलांना घराबाहेर काढण्यात आले. सामान घराबाहेर काढण्यात आले व जेसीबीच्या साह्याने घरे उद्धस्त करण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी तेथे राहणाऱ्या लोकांनी गोंधळ सुरू केला. परंतु बंदोबस्त असल्यामुळे कारवाईत खंड पडला नाही. या कारवाईत नुकतीच खोदलेली कूपनलिका जेसीबीच्या साह्याने उखडून काढण्यात आली. घरासाठी वापरलेले लोखंड, पत्रे हे सर्व सामान वनविभागाने जप्त केले आहे. कारवाईत अडथळा येऊ नये म्हणून सर्व लोकांना वनविभागाने ताब्यात घेतले. कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्यांना दुपारी सोडून देण्यात आले. (प्रतिनिधी)