‘सीसीटीव्ही संगणक’ समजून फोडला टीव्ही
By Admin | Updated: November 16, 2014 00:05 IST2014-11-16T00:05:54+5:302014-11-16T00:05:54+5:30
मसूरमध्ये घबराट : मागील चोऱ्यांचा तपासातील अपयशामुळे पोलिसांसमोर आव्हान

‘सीसीटीव्ही संगणक’ समजून फोडला टीव्ही
मसूर : कऱ्हाड-मसूर रस्त्यावर तसेच शामगाव रस्त्यावरील फोडलेल्या दुकानांतील चोरट्यांचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आलेले आहे. हॉटेल मंदारमध्ये नुकत्या झालेल्या चोरीतील चोरट्यांनी सीसीटीव्हीचा मॉनिटर समजून टीव्ही फोडला असला तरी ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याने कैद केले आहेत. त्यामुळे या चोरट्यांना गजाआड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.
मसूरला चोरट्यांनी लक्ष्य केल्यामुळे ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण दिसत आहे. ग्रामस्थ रात्री घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत. आठ महिन्यांपूर्वी ‘चोरटे आले रे, चोरटे दिसले रे...’ अशा आरोळ्या ठोकत ग्रामस्थांनी रात्रगस्त सुरू केली होती. त्यामध्ये ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
चोरट्यांनी हॉटेल फोडताना प्रथम ग्रीलचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये अपयश आल्याने त्यांनी खिडकीचा दरवाजा कटावणीने काढला. ग्रीलची खिडकी उचकटूनच काढून आत प्रवेश केला.
आतील टीव्ही म्हणजे सीसीटीव्हीचे फुटेज पाहायचा मॉनेटर आहे, असे समजून त्यांनी टीव्ही फोडला असावा, असा संशय हॉटेलमालक विजय माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. मात्र, सुदैवाने सीसीटीव्हीत चोरटे जेरबंद झाले आहेत. त्यापैकी एकाने डोक्यावर टोपी घातली होती. तर दुसऱ्याने तोंडाला रूमाल बांधला होता. साधारणत: हे चोरटे पंचवीस ते तीस वयाचे असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यापूर्वीच्या घटनांत चोरट्यांनी दरवाजे तोडण्यासाठी हायड्रोलीक गॅसकटरचा वापर केला होता. आताच्या चोरीत कटावणीचा वापर झाला आहे. त्यामुळे चोरीची पद्धत वेगळी आहे. चोरटे चोरी करण्यासाठी वेगवेगळळ्या पद्धतीचा वापर केला असल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)