अनावळेवाडी प्राथमिक शाळेतून टीव्ही, सिलिंडर चोरीला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:39 IST2021-08-15T04:39:53+5:302021-08-15T04:39:53+5:30
पेट्री : शहराच्या पश्चिमेस सातारा-कास मार्गावरील शाळा चोरट्यांकडून टार्गेट केल्या जात आहेत. चोरीचे सत्र अद्याप सुरूच आहे. अनावळेवाडी, ता. ...

अनावळेवाडी प्राथमिक शाळेतून टीव्ही, सिलिंडर चोरीला !
पेट्री : शहराच्या पश्चिमेस सातारा-कास मार्गावरील शाळा चोरट्यांकडून टार्गेट केल्या जात आहेत. चोरीचे सत्र अद्याप सुरूच आहे. अनावळेवाडी, ता. सातारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून शुक्रवारी रात्री शाळेतील एलसीडी टीव्ही व भारत कंपनीची भरलेली गॅस सिलिंडर चोरट्यांनी चोरून नेली. दरम्यान येथील अंगणवाडी शाळेत देखील कडीकोयंडा तोडण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु काहीही साहित्य चोरीस गेले नाही.
सातारा तालुक्यातील अनावळेवाडी गावात इयत्ता चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शुक्रवारी रात्री शाळेच्या एका खोलीचा व किचन शेडच्या दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून साधारण २० हजार रुपये किमतीचा एलसीडी टीव्ही व भारत कंपनीची भरलेली गॅस सिलिंडरची टाकी चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शनिवारी सकाळी शाळेच्या शिक्षिका राणी राऊत यांच्या निदर्शनास आली. दरम्यान गावचे पोलीस पाटील उमेश जानकर यांनी तालुका पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली आहे.
चौकट
वस्तूंवर चोरट्यांची नजर यापूर्वी कास मार्गावरील प्राथमिक शाळा जांभुळमुरे, पेट्री हायस्कूलमध्ये दोनदा तसेच प्राथमिक शाळा एकीव, ता. जावळी शाळेत एकदा चोरीची घटना घडली आहे. या चोऱ्यांमध्येदेखील गॅसची सिलिंडर टाकी, टीव्ही, संगणक संच आदी साहित्य चोरीला गेले होते. चोरीचे सत्र सुरूच असल्याने पोलिसांनी कसून तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी भागातील ग्रामस्थांतून होत आहे.
कॅप्शन/अनावळेवाडी प्राथमिक शाळेच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून टीव्ही,सिलिंडर टाकी चोरट्यांनी लंपास केली.(छाया-सागर चव्हाण)