साताऱ्याला वळवाने पाऊण तास झोडपले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST2021-05-03T04:33:58+5:302021-05-03T04:33:58+5:30
सातारा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वळवाचा पाऊस होत असून रविवारी सायंकाळच्या सुमारास सातारा शहर आणि परिसराला झोडपले. जवळपास ...

साताऱ्याला वळवाने पाऊण तास झोडपले...
सातारा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वळवाचा पाऊस होत असून रविवारी सायंकाळच्या सुमारास सातारा शहर आणि परिसराला झोडपले. जवळपास पाऊण तास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडत होता. या पावसामुळे शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. तसेच पाऊस झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, खंडाळा तालुक्यातील कवठे येथे वीज पडल्याने दोघांचा मृत्यू
सातारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून दोनवेळा वळवाचा पाऊस पडला आहे. गेल्या महिन्यात सलग पाच दिवस पाऊस झाला होता. त्यानंतर मागील आठवड्यातही साताऱ्यासह परिसरात आणि जिल्ह्यात वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी साताऱ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.
सातारा शहर व परिसरात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण तयार होते. मात्र, सायंकाळी चारनंतर अंधारून आले आणि बघता बघता गार वारा सुटून पावसाचे टपोरे थेंब पडू लागले. क्षणार्धात पाऊस मोठ्याने पडू लागला. यामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. जवळपास ४५ मिनिटे जोरदार पाऊस पडत होता. त्याचबरोबर ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू होता. यादरम्यान, शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. बराच वेळ वीज नव्हती. पाऊस कमी झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला.
मागील काही दिवसांपासून पाऊस होत आहे. रविवारी झालेला पाऊस हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा वळवाचा पाऊस होता. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच उकाड्याने हैराण झालेल्या सातारकरांना दिलासा मिळाला. दरम्यान, सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास पाऊस कमी झाला, पण त्यानंतरही ढगांचा गडगडाट सुरूच होता.