धरणाचे पाणी शेतात वळवू
By Admin | Updated: August 9, 2015 21:02 IST2015-08-09T21:02:38+5:302015-08-09T21:02:38+5:30
भारत पाटणकर यांचा इशारा : वांग-मराठवाडीवर क्रांतिदिनी श्रमिक मुक्ती दलाचे आंदोलन

धरणाचे पाणी शेतात वळवू
सणबूर : ‘जिल्ह्यातील सर्व धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने येत्या हिवाळी अर्थसंकल्पामध्ये वीस हजार कोटींची तरतूद करावी, अन्यथा सर्व धरणांतील पाणी सोडून जमिनी ताब्यात घेऊन सामूहिक शेती केली जाईल,’ असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. वांग-मराठवाडी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अशोक पाटील, वसंत मोहिते, श्रीरंग पाटील, उत्तम पवार, पोपट लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. पाटणकर म्हणाले, ‘गेली अनेक वर्षं धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम अपूर्ण आहे. विशेषत: १९७६ पूर्वीच्या आणि १९९९६-९७ या काळात झालेल्या कोयना, वारणा, धोम, कण्हेर, वांग-मराठवाडी, उजनी यासह इतर धरणांतील बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाची कामे निधीअभावी ठप्प झाली आहेत.शासनाने एकीकडे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या आणि धरणे बांधली. त्या धरणाच्या पाण्यात गावे आणि शेती बुडाली त्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे पुनर्वसन बाजूला ठेवून शासनाने जलयुक्त शिवायोजनेची घोषणा केली. या योजनेवर शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. आमचा विरोध जलयुक्त शिवाराला नाही. परंतु ते बांधलेले बंधारे भरण्यासाठी लागणारा साडेतीनशे ते पाचशे मिलीमीटर पाऊस हा दुष्काळी भागात पडत नाही. मग या बंधाऱ्यांत पाणी सोडणार कसे? यासाठी जास्त पाऊस पडणाऱ्या भागामध्ये धरणे बांधली. परंतु शासनाचे योग्य नियोजन नसल्यामुळे कोयनेपासून वारणेपर्यंत आणि उरमोडीपासून तारळी पर्यंतचे पाणी काही प्रमाणात सूर्याच्या उष्णेतेने वाया जात आहे, तर उरलेले कर्नाटकात जात आहे आणि दुष्काळी भागांना मात्र टँकरने पाणीपुरवठा केला
जातो. ही एक प्रकारची सामाजिक
गुन्हेगारी आहे. ती यापुढे खपवून घेणार नाही. असा इशारा भारत पाटणकर यांनी दिला. ते म्हणाले, शासनाने येत्या हिवाळी अधिवेशनात वीस हजार कोटींची तरतूद करून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचवावे. शिवाय उरलेले पुनर्वसन तातडीने करावे, अन्यथा आम्ही पुकारलेला एल्गार थांबवणार नाही.’ यावेळी शेकडो धरणग्रस्त उपस्थित होते. दिलीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. जगन्नाथ विभुते यांनी आभार
मानले. (वार्ताहर)
...पण शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही!
५५ वर्षांपासून कोणतेही पुनर्वसन झालेले नाही आणि शासन म्हणतंय पैसे नाहीत. तुम्हाला चिक्की खायला पैसे आहेत. पूर्वीच्या सरकारमध्ये सिंचन घोटाळ्यात खायला अजित पवार, सुनील तटकरे यांना पैसा होता. भुजबळांना भानगडी करायला पैसा होता; पण शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत,’ असा आरोप डॉ. पाटणकर यांनी यावेळी केला.
...अन्यथा सर्वांना बरोबर घेऊन आंदोलन !
शेतकऱ्यांना पैसे दिले तर आत्महत्या थांबतील, आम्ही अनेक चांगल्या मुद्द्यांचा आराखडा सरकारला पाठवला आहे. पण, हे सरकार यावर चर्चा करायलाच तयार नाही. पण यापुढे तुमच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, तर जानेवारी अखेर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना, शेतमजुरांना प्रकल्पग्रस्तांना घेऊन आंदोलन सुरू करू, असा इशारा डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.