मंगळवार ठरला ‘घणा’घाती!
By Admin | Updated: November 11, 2014 23:21 IST2014-11-11T22:29:08+5:302014-11-11T23:21:11+5:30
तीनमजली दुकानाला पालिकेचे टाळे--लोकमतचा दणका

मंगळवार ठरला ‘घणा’घाती!
सातारा : मोती चौकापासून काही अंतरावर असलेल्या ‘सिटी सेंटर’ या तीनमजली कापड दुकानाला मंगळवारी पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने टाळे ठोकले. या इमारतीचे दोन मजले अवैध असून रस्ता रुंदीकरणासाठी जागा सोडली नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
शहर नियोजन विभाग आणि अतिक्रमण हटाव विभागाने सलग दुसऱ्या दिवशी ही मोहीम सुरूच ठेवली. दुपारी साडेबारा वाजता ‘सिटी सेंटर’ दुकानापासून अतिक्रमण हटविण्यास सुरूवात झाली. या दुकानाचे मालक मोहित कटारिया हे बाहेरगावी गेले होते. त्यांच्या दुकानात फक्त कर्मचारी होते. पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, ‘मालक येईपर्यंत आम्ही दुकानातून बाहेर जाणार नाही,’ अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस आल्यानंतर पोलिसांनी सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर सर्वजण एक-एक करत दुकानातून बाहेर आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दुकानाला टाळे ठोकले.
अतिक्रमण हटाव मोहिमेची टीम दुपारी दोन वाजता जगताप कॉलनीत पोहोचली. या ठिकाणी प्रस्तावित रस्ता आहे. मात्र, अजिंक्य प्रकाश भोईटे यांनी त्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये गॅरेज थाटले आहे. हे गॅरेज काढण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी गॅरेज हटविण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मोहिमेत भागनिरीक्षक अनिल भोसले, दुर्वास कांबळे, गोविंद मोहिते, विश्वास गोसावी, प्रकाश शिर्के आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
सातारा : पुणे-बंगळूर महामार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी अतिक्रमणे आणि बांधकामे काढून टाकण्यास मंगळवारी सुरुवात झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि रिलायन्स कंपनी यांनी संयुक्तपणे मोहीम राबवत महामार्गावरील तीसहून अधिक ठिकाणची अतिक्रमणे काढून टाकली. अनेक ठिकाणी भिंती आणि झाडेही काढण्यात आली. या मार्गावरील ३५ हून अधिक अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली आहे.
महामार्ग सहापदरीकरणाचे काम सुरु करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात रुंदीकरणात अडथळा ठरणारी अतिक्रमणे, बांधकामे पाडून टाकण्यात येत आहेत. याकामी मदतीसाठी पोलिसांनाही घेण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता बॉम्बे रेस्टॉरंटपासून बांधकामे पाडण्यास सुरुवात झाली. हॉटेल महेंद्रा एक्झिक्युटिव्ह, महिंद्रा शोरुम, गजानन आॅटोमोबाईल त्याचबरोबर अन्य शोरुमधारकांनी महामार्गालगत उभारलेल्या भिंती आणि कमानी जेसीबीच्या साह्याने काढून टाकण्यात आल्या. ओतारी कोल्ड स्टोेरेजचे बांधकाम काढून घेण्यासाठी अधिकारी आले असता मालक विद्यापती ओतारी यांनी त्यांना अटकाव केला. अधिकारी ओतारी यांच्याशी चर्चा करत होते तरी ते ऐकत नव्हते. ‘अगोदर मला आराखडा दाखवा आणि मगच बोला,’ असे ते म्हणत होते. ओतारी पोलिसांचेही ऐकायला तयार नव्हते. तासाभराच्या हुज्जतीनंतर त्यांना कागदपत्रे दाखविण्यात आली आणि त्यांनी माघार घेतली. यानंतर येथील बांधकाम काढण्यात आले. (प्रतिनिधी)
आजही मोहीम सुरूच राहणार
पुणे-बंगळूर महामार्ग रुंदीकरणात जी बांधकामे अडथळा ठरली होती ती पाडताना आणि यावेळी जी चर्चा होत होती, त्याचे चित्रीकरण करण्यात येत होते. कोणताही वाद उद्भवू नये म्हणून अथवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून नहाय, रिलायन्स आणि पोलिसांनी काळजी घेतली होती.
दोन कर्मचाऱ्यांची खातेअंतर्गत बदली !
अतिक्रमण करणाऱ्यांना वारंवार पाठीशी घातल्याचा ठपका पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे त्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते दोन कर्मचारी अतिक्रमण हटाव विभागात कार्यरत आहेत.