ट्रक-दुचाकी अपघातात वांगीचा तरुण ठार
By Admin | Updated: November 29, 2015 01:01 IST2015-11-29T00:53:55+5:302015-11-29T01:01:18+5:30
शेळकबावजवळ घटना : चालकाचे ट्रकसह पलायन; गुन्हा दाखल

ट्रक-दुचाकी अपघातात वांगीचा तरुण ठार
वांगी : शेळकबावहून वांगीकडे जाणारा ट्रक व दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सोने-चांदी गलाई व्यावसायिक मदन रमेश पाटील (वय २३, रा. वांगी, ता. कडेगाव) हा तरुण जागीच ठार झाला. हा अपघात शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शेळकबाव गावाजवळ वांगी रस्त्यावर येरळा नदीनजीक झाला. या अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रकसह पलायन केले. त्यामुळे वांगी व शेळकबाव येथे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
वांगी येथील मदन पाटील हा तरुण शनिवारी सकाळी ८ वाजता किराणा माल आणण्यासाठी शेळकबावकडे निघाला होता. वांगी रस्त्यावर येरळा नदीपात्राजवळ वळण आहे. येथे वांगीकडे येणाऱ्या ट्रकने मदन याच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली.
अपघातात मदन जागीच ठार झाला.
हा अपघात घडला त्यावेळी रस्त्यावर आणि शेतातही कोणी नसल्याची संधी साधत ट्रकचालकाने गाडीसह पलायन केले. काही वेळानंतर या अपघाताची माहिती वांगी व शेळकबाव येथे समजताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. मृत मदन याचे मूळगाव कऱ्हाड तालुक्यातील नांदगाव असून, त्याचे सर्व कुटुंब गेल्या काही वर्षांपासून वांगी येथे मामाच्या गावात वास्तव्य करीत आहे.
या अपघातातील मृत मदन पाटील हा घरातील कर्ता होता. त्याचा उत्तरप्रदेशातील बनारस येथे सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. दीपावलीसाठी तो वांगीला आला होता. त्याच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
अपघाताची माहिती मिळताच चिंचणी (वांगी) पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चिंचणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मदन याच्यावर दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)
पोलिसांना तपासाचे आव्हान
ज्या ट्रकने दुचाकीस्वाराला उडवून ठार केले, त्या ट्रकचालकाने ट्रकसह घटनास्थळावरून पलायन केले. स्थानिक नागरिकांनीही ट्रकचा तपास घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ट्रक सापडला नाही. त्यामुळे आता अपघातातील ट्रक शोधून काढून चालकावर गुन्हा दाखल करण्याचे चिंचणी-वांगी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
धोकादायक वळणावर वारंवार अपघात
वांगी-विटा रस्त्यावर पाणीपुरवठा पाईपलाईन असून, तेथे मोठे वळण आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात बाभळीची झुडपे आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन लवकर दिसत नाही. परिणामी या वळणावर वारंवार लहान-मोठे अपघात होतात. या रस्त्यालगतची झुडपे वेळीच काढली असती तर मदन पाटील या तरुणाचे प्राण वाचले असते.