कऱ्हाडात संतप्त जमावाकडून तोडफोड
By Admin | Updated: October 19, 2014 22:45 IST2014-10-19T22:23:30+5:302014-10-19T22:45:00+5:30
पोलिसांचा लाठीमार : इमारतींसह वाहनांवर दगडफेक

कऱ्हाडात संतप्त जमावाकडून तोडफोड
कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण होत आली असताना दुपारी १२.३० च्या सुमारास संतप्त झालेल्या जमावाने तोडफोड केली. यावेळी दगडफेकीत दीपक प्राईड या इमारतीसह वाहनांचे नुकसान झाले. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
शहरातील रत्नागिरी गोदाममध्ये कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होती. त्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणी केंद्रापासून काही अंतरावर पोलिसांकडून बॅरिकेटस लावण्यात आले होते. भेदा चौकातून पोपटभाई पेट्रोल पंपाकडे जाणारा मार्ग, विजय दिवस चौकाकडे जाणारा मार्ग व तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विविध पक्षांचे, उमेदवारांचे समर्थक जमा झाले होते. दुपारी १२ च्या सुमारास मतमोजणी अंतिम टप्प्यात होती. पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर होते. त्यावेळी भेदा चौकातून पोपटभाई पेट्रोल पंप चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर थांबलेल्या समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी मोठी धावपळ उडाली. काहीजणांनी इमारती तसेच वाहनांवर दगडफेक सुरू केली. (प्रतिनिधी)