चारचाकीच्या आकर्षक क्रमांकासाठी तिप्पट फी
By Admin | Updated: October 16, 2014 22:50 IST2014-10-16T22:05:56+5:302014-10-16T22:50:43+5:30
उद्यापासून नवीन मालिका : एमएच,११.बीटी एक ते ९९९९ क्रमांक

चारचाकीच्या आकर्षक क्रमांकासाठी तिप्पट फी
सातारा : सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने दि. १८ पासून दुचाकी वाहनांसाठी एमएच ११ बीटी एक ते ९९९९ ही नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे. आकर्षक क्रमांक हवे असणाऱ्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच या दुचाकीच्या मालिकेतील आकर्षक क्रमांक चारचाकीसाठी हवा असणाऱ्यास नियमानुसार तिप्पट फी भरून घ्यावा लागणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने दुचाकी वाहनासाठी एमएच ११ बीटी एक ते ९९९९ ही नवीन मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पसंतीचा क्रमांक देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार नोंदणी क्रमांक काटेकोरपणे नेमून देण्यात येतील. अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार नियम १९८९ च्या नियम ५ अ मध्ये विहित केलेल्या पत्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराची ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड, निवडणूक आयोग ओळखपत्र, पासपोर्ट आदींच्या साक्षांकित प्रति आवश्यक आहेत. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या शुल्काची रक्कम ५० हजारांपेक्षा अधिक असल्यास संबंधित शुल्क राष्ट्रीयकृत बँकेच्या, शेड्यूल्ड बँकेच्या धनादेशाद्वारे भरणे बंधनकारक आहे.
शनिवार, दि. १८ रोजी सकाळी १० ते दुपारी दीडपर्यंत आकर्षक क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जातील. ज्या क्रमांकासाठी एक अर्ज आला असेल, त्या अर्जदारास त्या क्रमांकाची फी त्वरित भरावी लागणार आहे.
ज्या क्रमांकासाठी जादा अर्ज येतील त्या क्रमांकाच्या अर्जाचा निकाल दुसऱ्या दिवशी दुपारी चारपर्यंत दिला जाईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
एकापेक्षा अधिक अर्जदार...
एकापेक्षा अधिक अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज केल्यास अशामध्ये अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी चारपर्यंत निर्धारित फीच्या रकमेचा धनाकर्ष व निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेचा धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करावा लागेल. जो अर्जदार सर्वात जास्त रकमेच धनाकर्ष सादर करेल, त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.