‘व्हॉट्स अॅप’वरून चिथावणी देणारे तिघेजण ताब्यात
By Admin | Updated: November 6, 2014 00:02 IST2014-11-05T23:50:47+5:302014-11-06T00:02:55+5:30
कऱ्हाड विधानसभा निवडणूक : जामीन फेटाळला, आणखी काहीच्या अटकेची शक्यता

‘व्हॉट्स अॅप’वरून चिथावणी देणारे तिघेजण ताब्यात
कऱ्हाड : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कऱ्हाड दक्षिणचे राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत विशिष्ट धर्मीयांचा संदर्भ वापरून ‘व्हॉट्सअॅप’च्या माध्यमातून बदनामीकारक मजूकर प्रसिद्ध करून अन्य धर्मीयांना पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधी मतदान करण्यासाठी चिथवणीखोर आवाहन केल्याप्रकरणी अज्ञातांचा शोध घेण्यात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे़ याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, आज (बुधवारी) त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन नाकरला आहे़
सागर श्रीकांत काळे (वय २५, रा. पावसकर गल्ली, कराड) सचिन श्रीकांत पावसकर (वय ४०, रा. सोमवार पेठ, कराड), गणेश प्रल्हाद पवार (वय ३०, रविवार पेठ, कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्ते संजय चव्हाण यांचे मित्र दीपक रावते यांच्या मोबाईलमधील ‘व्हॉट्सअॅप’वर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराच्या सांगता सभेपूर्वी काढण्यात आलेल्या रॅलीत विशिष्ट धर्र्मीयांची संख्या अधिक होती. त्या धर्र्मीयांच्या धार्मिकस्थळासाठी आठ एकर जागा व पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे, अशी खोटी माहिती टाकून अन्य धर्र्मीयांनी त्यांच्या धर्माच्या रक्षणासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात मतदान करावे, असे आवाहन करणारा मजूकर शहरातील एका युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या नावाने पाठविण्यात आला होता़ त्यामुळे दोन धर्र्मीयांमध्ये द्वेषभावना निर्माण करून तणावाची परिस्थिती लादण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून केला जात आहे. हा प्रकार संबंधितांनी स्वत: किंंवा कोणी अज्ञाताने हेतूपूर्वक केला आहे. तरी त्यांच्या विरोधात माझी तक्रार आहे, अशा आशयाची तक्रार संजय चव्हाण यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली होती.
माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर करून पृथ्वीराज चव्हाण यांची बदनामी करून त्यांच्या विरोधात मतदान करण्यासाठी चिथावणी दिल्याबद्दल अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी अविनाश वनवे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करून सागर काळे, सचिन पावसकर, गणेश पवार तीन जणांना अटक केली आहे.
बुधवार, दि. ५ रोजी येथील न्यायालयात संशयितांना हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना जामीन नामंजूर करण्यात आला़ त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
अनेकजण नॉट रिचेबल..
याप्रकरणी आणखी १५ ते २० जणांची नावे निष्पन्न झाली असल्याचे पोलीस सांगतात़ मात्र, याची कानकून संबंधितांना लागल्याने ते पसार असून, त्यांचे फोनही नॉट रिचेबल असल्याचे अविनाश वनवे यांनी सांगितले. मात्र, त्यामुळे शहरातील आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे़