सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग
By Admin | Updated: November 27, 2014 00:23 IST2014-11-26T22:40:21+5:302014-11-27T00:23:59+5:30
पसरणी घाटातील दुर्घटना : प्रशासनाच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग
वाई : वाई-पाचगणी दरम्यान असणाऱ्या पसरणी घाटात आज (बुधवारी) दुपारी तीनच्या सुमारास गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली. ट्रक चालकाकडून या दुर्घटनेची माहिती समजताच वाई पालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास वाई औद्योगिक वसहातीतील एका पेट्रोलियम कंपनीचा गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक (एमएच १० झेड १११३) वाईहून पाचगणीकडे चालला होता. ट्रक पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराजवळ आला असता, ट्रकच्या बॅटरीतून अचानक धूर येऊ लागला. हा धूर चालकाच्या निदर्शनास येताच त्याने तत्काळ ट्रक जागेवर थांबविला व संंबधित कंपनीला या घटनेची माहिती दिली.
यानंतर संबंधित कंपनीने तत्काळ वाई पालिकेच्या अग्निशामक दलास या घटनेची सूचना दिली. अग्निशामक दलाच्या कर्मचारीऱ्यांनी घटनास्थळी येऊन ट्रकला लागलेली आग एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आली. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
पसरणी घाटातून महाबळेश्वर, पाचगणीला जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्याने या मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक अचानक पेट घेतल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये घबराट पसरली होती. या घटनेमुळे पसरणी घाटात काहीकाळ वाहतूक देखील ठप्प झाली होती. (प्रतिनिधी)