वजीर सुळका सर करून तानाजी मालुसरे यांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST2021-02-06T05:14:05+5:302021-02-06T05:14:05+5:30
लोणंद : येथील एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांच्या प्रेरणेतून व ॲडव्हेंचर स्पोर्ट्स यांच्या मार्गदर्शनाखाली सात वर्षाच्या मुलीसह लोणंदमधील युवकांनी वजीर ...

वजीर सुळका सर करून तानाजी मालुसरे यांना मानवंदना
लोणंद : येथील एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांच्या प्रेरणेतून व ॲडव्हेंचर स्पोर्ट्स यांच्या मार्गदर्शनाखाली सात वर्षाच्या मुलीसह लोणंदमधील युवकांनी वजीर सुळका सर करून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना मानवंदना दिली.
यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी...’ ‘ जय तानाजी मालुसरेऽऽ’ अशा घोषणा देत या मावळ्यांनी सर्वांत अवघड असा वजीर सुळका सर केला.
सिंहगड जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांच्यासह मावळे कोंढाणा सर करायला पुढे सरसावले. त्याच पद्धतीचा पेहराव करीत वजीर सुळका सर करण्याची कामगिरी लोणंदकरांनी केली आहे. यावेळी सुळक्याच्या माथ्यावर जाऊन तानाजी मालुसरे यांचा जयघोष करण्यात आला. या मोहिमेत सात वर्षांच्या ध्रुवी गणेश पडवळ या बालिकेने, तर १२ वर्षांच्या युवराज जाधव या मुलाने हा अवघड असा सुळका सर करीत तानाजी मालुसरे यांना अभिवादन केले.
या मोहिमेत एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांच्यासह विश्वास मिसाळ, यशोदीप काकडे, ॲडव्हेंचर फोटोग्राफर मेहुल ढवळे, राजेंद्र काकडे, निमेश रावळ, सचिन भांगरे, अनिकेत धायगुडे, संकेत हाके, आकाश क्षीरसागर, राजेंद्र धायगुडे यांच्यासह प्रमुख लहू उगाडे, कृष्णा मरगाळे, शंकर मरगाळे, रोहित अंदोडगी, तुषार दिघे, सोनाली वाघे, विलास कुमकलेे, सूरज भगत यांचा सहभाग होता.
याच पार्श्वभूमीवर लोणंदकरांनी नरवीर तानाजी मालुसरे यांना मावळ्यांचा वेश परिधान करीत भगवी सलामी दिली.
उंच उंच टेकड्या... घनदाट जंगल... सभोवताली खोलगट दरी... या मधोमध उभा असलेला हा नव्वद अंशांतील सरळ सुळका म्हणजे कोणाच्याही अंगावर काटा येईल अशी ही जागा. तिथे सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकतो अशा वजीर सुळक्याची चढाई करण्याची कल्पनाही करणे अशक्य आहे. निसरडी वाट, सरळ उभी चढाई, त्याच्या पूर्वेकडे सहाशे फूट खोल दरी अशा या सुळक्यावर यशस्वीपणे चढाई करण्याची कामगिरी सात वर्षांच्या ध्रुवीने करून नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. २०१८ मध्ये नऊ वर्षांच्या मुलीने वजीर सुळका सर केला होता.
फोटो ०४लोणंद-वजीर सुळका
अवघड असा वजीर सुळका सर करून लोणंदमध्ये मावळ्यांनी तानाजी मालुसरे यांना मानवंदना दिली.