दु:ख विसरून अर्धांगवायूग्रस्तांवर उपचार
By Admin | Updated: June 27, 2016 00:38 IST2016-06-26T23:01:17+5:302016-06-27T00:38:24+5:30
दृष्टिहीन असूनही शरद इंगवले यांनी उभारला स्वत:चा व्यवसाय

दु:ख विसरून अर्धांगवायूग्रस्तांवर उपचार
सचिन काकडे -- सातारा -आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर अनेकजण आकाशाला गवसणी घालतात; परंतु ज्यांच्याकडे दृष्टीच नाही अशा व्यक्तीचं काय? असा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकतो; मात्र आज दृष्टिहीन असलेल्या व्यक्तीही कुठेच कमी नाही. सातारा तालुक्यातील किडगाव येथे राहणारे शरद जोतिराम इंगवले (वय ३१) यांनी हे साध्य करून दाखविले आहे. दृष्टिहीन असूनही आपल्या कल्पक बुद्धीच्या बळावर एक व्यावसायिक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे.
शरद इंगवळे हे अंध असूनही त्यांना आपल्या जीवनात या गोष्टीची कधीच अडचण आली नाही. उलट अंधत्वावर मात करून त्यांनी एमएबीएड पर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिक्षक होऊन सुजाण नागरिक घडविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. या दृष्टीने त्यांची वाटचालही सुरू आहे. दरम्यान, संसाराचा गाडा हाकण्यासाठी काहीतरी करायला हवे. म्हणून त्यांनी मुंबई येथे अॅक्युपे्रशर, फूट रिफ्लेक्टॉलॉजी आणि बॉडी मसाज असा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. याचा त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून चांगला फायदा होत आहे.
अर्धांगवायूग्रस्त व्यक्तींवर शरद इंगवले अॅक्युपे्रशन आणि फूट रिफ्लेक्टॉलॉजीद्वारे उपचार करतात. अनेक डॉक्टर रुग्णांना हा उपचार करण्याचा सल्ला देतात. तीन महिन्यांमध्ये ३० रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. उत्तम उपचारपद्धतीमुळे रुग्णांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर शरद इंगवले आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत.
साताऱ्यातील सत्यशोध व नॅब या अंधांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून मोठे सहकार्य मिळाले. आजही मिळत आहे. शिक्षक बनून ज्ञानार्जनाचे काम करण्याचे स्वप्न आहे. त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.
- शरद इंगवले